वाळूज महानगर : वाळूज पोलिसांच्या सतर्कतेमुळे दिघी शेतवस्तीवर दरोडा टाकण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न फसल्याची घटना काल रात्री घडली. वाळूज परिसरातील दिघी येथील चौधरी शेतवस्तीवर १ आॅगस्टला मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास चार दरोडेखोर लुटमारीच्या इराद्याने पोहोचले होते. त्यांनी शेतवस्तीवर वास्तव्यास असणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला करून लूटमार करण्याचा बेत रचला होता. घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चाहूल लागताच घरातील मंडळींनी आरडाओरडा करून मोबाईलद्वारे या घटनेची माहिती गावातील नागरिक व वाळूज पोलिसांना दिली.सुदैवाने जवळच वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवचंद राठोड व त्यांचे सहकारी गस्त घालीत होते. पोलिसांनी तात्काळ चौधरी शेतवस्तीकडे धाव घेतली. पोलीस आल्याचे दिसताच दरोडेखोर अंधारात पसार झाले. या परिसरात पाऊस झाल्यामुळे पोलिसांनी वाहन बाजूला उभे करून चिखल तुडवीतच या शेतवस्तीवर धाव घेऊन घाबरलेल्या मंडळींना दिलासा दिला.यावेळी घटनास्थळी दरोडेखोरांना हल्ला करण्यासाठी विटा व दगड जमा करून ठेवल्याचे गस्ती पथकाला दिसून आले. वाळूज पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसल्यामुळे शेतवस्तीवरील शेतकरी कुटुंबीय व ग्रामस्थांनी पोलीस पथकाचे आभार मानले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे दिघीत दरोड्याचा प्रयत्न असफल
By admin | Published: August 04, 2014 1:28 AM