दौलताबाद (औरंगाबाद ) : ऊस भरुन जाणाऱ्या ट्रकमुळे या महामार्गावर वाहतुकीला अडथळा येत आहे. या महामार्गावर दौलताबाद टी पॉइंटपुढे जड वाहतुकीस बंदी असूनही उसाच्या ट्रक धावतात. यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून याचा फटका पर्यटकांना बसत आहे.
दौलताबाद घाटाखाली असलेल्या ऐतिहासिक दिल्ली दरवाजातून मोठ्या प्रमाणावर उसाच्या ट्रकची वाहतूक होते. या ट्रकचे घर्षण होऊन दरवाजांचे नुकसान होते. तरीही जड वाहतुकीवर बंदी केली जात नाही. हा दरवाजा अरुंद असून जड वाहनांमुळे अनेकदा वाहतूक ठप्प होते. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु असल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. दौलताबाद घाटामध्ये उसांच्या ट्रकमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने हे ट्रक कसाबखेडा फाटा मार्गे वळवावे, अशी मागणी ग्रामस्थांसह पर्यटकांकडून होत आहे.