टेंभूर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथे पाणी पुरवठा करणाऱ्या लाखो रुपयांच्या योजना कुचकामी ठरल्या असून,पाणी पुरवठा करणाऱ्या गावांतर्गत जलवाहिन्या जागोजागी फुटल्याने ग्रामस्थांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.टेंभूर्णी हे जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे. येथील लोकसंख्या सुमारे १८ हजार आहे. तीस वर्षापूर्वी अकोला देव येथील जीवरेखा धरणावरून टेंभूर्णीला नळयोजना करण्यात आली होती. या नळयोजनेचे पाईप सिमेंटचे होते. त्यामुळे या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने ही नळयोजना बंद पडली आहे. त्यानंतर टेंभूर्णीसाठी भारत निर्माण योजने अंतर्गत जीवरेखा धरणातून नळयोजना करण्यात आली. मात्र, टेंभूर्णीची लोकसंख्या पाहता ही नळयोजनाही अपुरी पडली. टेंभूर्णीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तत्कालिन सरपंच बद्रोद्दीन सिद्दीकी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना ही कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी व तत्कालिन पाणी पुरवठा अभियंता यांच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे कुचकामी ठरली. त्यामुळे शासनाने दोन कोटी रुपये खर्चूनही टेंभूर्णीकराना आजही महिनोमहिना पाणी मिळत नाही.सद्यस्थितीत टेंभूर्णी गावांतर्गत असलेल्या जलवाहिन्यांना तीस वर्षानंतर झाल्याने त्या जुनाट झाल्या आहेत. ठिकठिकाणी गळती लागल्याने नळाला पाणी कमी व गटाराला जास्त अशी परिस्थिती सध्या पहावयास मिळत आहे. मात्र, जलवाहिन्या फुटलेल्या असल्याने याच गटाराचे पाणी नळाला येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या टेंभूर्णीत ताप, सर्दी, खोकला, पोटदुखीचे आजार दुषित पाण्यामुहेच असल्याचे वैद्यकीय अधीक्षक नारायण तलवाडकर यांनी सांगितले. मात्र, साथीचे रोग नसल्याचेही त्यांनी सांगितले. दुषित पाणी पुरवठा व ब्लिचिंग पावडरबाबत सरपंच विष्णू जमधडे म्हणाले की, आम्ही गावांतर्गत जलवाहिनी बदलण्यासाठी प्रस्ताव तयार करणार आहे.
दूषित पाण्यामुळे टेंभूर्णीत ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: August 20, 2015 12:27 AM