श्रीनिवास भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तेलकंपन्याचे नुकसान टाळण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दररोज बदल करण्याचा निर्णय घेतला़ या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे़ निर्णय लागू झाल्यापासून दररोज २ पैसे, ५ पैसे अशाप्रकारे तीन महिन्यात नांदेडात पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर ३़८२ रुपयांनी वाढ झाली आहे़डॉलर आणि क्रुडच्या किंमतीनूसार उद्याच्या पेट्रोल, डिझेलचे दर ठरत आहेत़ या निर्णयामुळे पेट्रोलच्या किंमती कमी जास्त होत राहणार आहेत़ त्यामुळे आज मिळालेल्या दरामध्ये उद्या पेट्रोल मिळेल, असे नाही़ डीपीसी योजना म्हणजेच डेली प्राईज चेंज यानुसार किंमतीत दररोज बदल होत आहे़ हा निर्णय १६ जुन रोजी लागू करण्यात आला आहे़ त्यासाठी पेट्रोल पंप एका सर्व्हरशी जोडल्या गेले आहे़ यामध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्यास पेट्रोल पंपचालकाचे नुकसान होत आहे़ त्याचबरोबर स्ट्रॉक असलेल्या पेट्रोलच्या किंमती वाढल्या अथवा कमी झाल्या तर त्याचा नफा-तोटा संबंधीत पंप चालकाला सहन करावा लागतो़ या निर्णयामुळे पेट्रोलचे दर कमी होतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती़ परंतु, मागील तीन महिन्यात स्लो पॉयझिनिंग प्रमाणे किंमतीत वाढ झाली आहे़ कधी पाच पैसे तर कधी तीन पैसे असे तीन महिन्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३ रुपये ८२ पैसे तर डिझेलचे २़७२ रूपये वाढले आहेत़ ही वाढ ग्राहकांना तत्काळ लक्षात येत नाही़नांदेड शहरामध्ये १ एप्रिल रोजी पेट्रोल ७३़२६ रूपये प्रतिलिटर तर डिझेल ६१़६९ रूपये प्रतिलिटर होते़ यामध्ये १६ एप्रिल रोजी वाढ होवून पेट्रोल-७५़०१ रूपये तर डिझेल-६१़६९ रूपये, १ मे रोजी पेट्रोल-७८़०३ रूपये तर डिझेल-६३़४७ रूपये झाले़ यानंतर १६ मे रोजी किंमतीत घट होवून पेट्रोल - ७५़३३ तर डिझेल ६०़९१ रूपये झाले़ यानंतर पुन्हा १ जून रोजी पेट्रोल ७८़९१ रूपये प्रतिलिटर तर डिझेल ६१़९९ रूपये प्रतिलिटर झाले़ पुढे डीपीसी निर्णयाची अंमलबजावणी झाली़ १६ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत पेट्रोलच्या किंमतीत ३़८२ रूपये वाढ होवून ८१़१३ रूपये तर डिझेल २़७२ रूपयांनी वाढून ६३़०६ रूपये प्रतिलिटर झाले आहे़या निर्णयामुळे ना ग्राहक, ना पेट्रोल पंप चालक समाधानी झाले़ उलट दोघांचेही नुकसान होत असून केवळ पेट्रोल कंपन्यांचा फायदा होत असल्याचे चित्र आहे़
सततच्या इंधन दरवाढीमुळे नांदेडकर संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:50 AM