लातूर : जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत डिसेंबर २०१६ अखेर ६९६ महिला अत्याचाराच्या विविध घटना घडल्या आहेत. २०१५ मध्ये हाच आकडा ७३३ आणि २०१४ मध्ये ८९६ पर्यंत गेला होता. २०१६ मध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये ३८ गुन्ह्यांची घट असल्याचे पुढे आले आहे.लातूर जिल्ह्यातील ६ उपविभागाअंतर्गत येणाऱ्या २४ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गंभीर गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे. २०१४ ते २०१६ या तीन वर्षांतील आकडेवारी लक्षात घेतली असता २०१६ मध्ये ३८ गुन्ह्यांची घट झाल्याचे पुढे आले आहे. सर्वाधिक गुन्हे हे २०१४ मध्ये घडले आहेत. या वर्षात तब्बल ८९६ महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद आहे. त्याखालोखाल २०१५ मध्ये ७३३ महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. तर २०१६ डिसेंबरअखेर ६९६ महिला अत्याचाराच्या घटना नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये २०१४ मध्ये हुंड्यासाठी खुनाच्या घटना १२, इतर खुनाच्या घटना १३, हुंड्यासाठी खुनाचा प्रयत्न २८, हुंडाबळी ४, आत्महत्येस प्रवृत्त करणे २५, बलात्काराच्या घटना ५४, छळाच्या घटना ३२३, विनयभंगाच्या घटना १९६, महिलांचा अनैतिक व्यापार ३, महिलांवरील अत्याचार प्रकरणी सायबर क्राईमअंतर्गत २ गुन्ह्यांची नोंद आहे. मुलांचे अपहरण २६ आणि नवजात अर्भक फेकून देण्याच्या घटना १५ आदी एकूण ८९६ घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे. २०१५ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या दरम्यान हुंड्यासाठी खून ७, इतर खून ८, हुंड्यासाठी खुनाचा प्रयत्न २७, हुंडाबळी ८, आत्महत्येस प्रवृत्त करणे २२, बलात्काराच्या घटना ५०, छळाच्या घटना २०५, विनयभंग १६१, पळवून नेणे १११, महिलांचा अनैतिक व्यापार ६, महिला अत्याचार प्रकरणी सायबर क्राईमअंतर्गत ५ गुन्ह्यांची नोंद आहे. मुलांच्या अपहरणाच्या ४७ घटना घडल्या असून, १५ ठिकाणी अर्भक फेकून देण्याच्या घटना घडल्याची नोंद आहे. अशा एकूण ७३३ गुन्ह्यांची नोंद या काळात झाली आहे. २०१६ मध्ये हुंड्यासाठी खून ९, इतर खून १०, हुुंड्यासाठी खुनाचा प्रयत्न १५, हुंडाबळी ५, आत्महत्येस प्रवृत्त करणे २३, बलात्काराच्या घटना ४७, छळ २०४, विनयभंग १४४, पळवून नेणे ६०, सायबर क्राईमअंतर्गत एकही गुन्हा दाखल नाही. लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना ७ अशा एकूण ७९६ गुन्ह्यांची नोंद आहे. (प्रतिनिधी)
महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत झाली घट
By admin | Published: January 16, 2017 12:51 AM