औरंगाबाद : मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि मागणी वाढल्याने गुरुवारी नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला, तर दुसरीकडे जेट एअरवेजच्या विमानसेवेसाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जेट एअरवेजने सायंकाळपाठोपाठ २३ मार्चपासून सकाळचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द केले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना केवळ एअर इंडियाच्या विमानाचाच पर्याय उरला आहे. परिणामी प्रवाशांची गर्दी अधिक आणि विमानातील आसनक्षमता कमी, अशा परिस्थितीला एअर इंडियाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मोठे विमान आणण्यासाठी एअर इंडियाकडून प्रयत्न करण्यात आला.
एअर इंडियाचे १२२ प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई-औरंगाबाद-दिल्ली, दिल्ली-औरंगाबाद-मुंबई मार्गावर आहे. प्रवाशांची मागणी वाढत असल्याने गत आठवड्यात मोठ्या आकाराचे विमान देण्याची मागणी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे केली. गुरुवारी १२२ ऐवजी १६२ आसनक्षमता असलेले विमान देण्यात आले. या विमानातून १५० प्रवाशांनी मुंबईचा प्रवास केला. प्रवासी कमी असल्याने शुक्रवारी मात्र नेहमीप्रमाणे १२२ प्रवासी क्षमतेच्या विमानाने उड्डाण केल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेट एअरवेजच्या सकाळच्या वेळेतील मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ६ एप्रिलपासून सुरू होणार होते; परंतु आता या विमानाचे उड्डाण आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रवासी सुविधावरिष्ठ कार्यालयाने मागणी मान्य करीत गुरुवारी मोठे विमान दिले. त्यामुळे नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या विमानाने उड्डाण घेतले. त्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला, अशी माहिती एअर इंडियाचे अजय भोळे यांनी दिली.