- प्रमोद शेजुळ
भराडी (औरंगाबाद ) : - सिल्लोड तालुक्यात भीषण दुष्काळ, पाणी व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल झाला आहे. शनिवारी भराड़ीत भरणाऱ्या जनावरांच्या आठवड़ी बाजारात विक्री साठी तब्बल 1 हजाराच्या वर जनावरे विक्रीसाठी आली होती. जनावरे जास्त व ती घेणारे व्यापारी कमी आल्याने कवडी मोल भावात जनावरांची विक्री झाली.
सत्तर ते 80 हजाराची बैल जोड़ी हताश झालेल्या शेतक ऱ्यानी कसाई झालेल्या व्यापाऱ्याना केवळ 40 ते 50 हजारात विकल्या आणि शेतकरी ढसा ढसा रडू लागले. न विकावे तर त्यां जनावरांचा उदरनिर्वाह कसा करावा.. विकावेतर भाव नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहे.मुलां सारखे जीव लावलेल्या जनावराना शेतकरी बाजार दाखवित असल्याचे विदारक चित्र सिल्लोड तालुक्यातिल भराड़ी येथील आठवड़ी बाजारात बाघायला मिळाले.
सिल्लोड तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पशुधन विक्रीस काढले आहेत. बाजारात पशुधन विक्रीचे प्रमाण वाढल्याने भाव दुपटीने घसरले आहे.मागील महिन्यात जनावरे बाजारात येण्याचे प्रमाण कमी होते मात्र आता प्रमाण वाढले आहे.
काही शेतकरी चारा शोधण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र चाऱ्याचे भाव आकाशाला भिडले आहे.500 ते 700 रूपयाला मिळणारे कडब्याचे गुड़ आता 2 ते 3 हजारात मिळत आहे. शिवाय कुट्टी करने वाहतूक खर्च हे सर्व सामान्य शेतकऱ्याला परवडनारे नाही.पाणी नसल्याने मकाची वाढ झाली नाही. यामुळे चारा कमी निघाला आहे. परजिल्ह्यात चारा मागणी वाढल्याने भाव वाढले आहे.परजिल्ह्यात जाणारा चारा रोखला गेला तर किमान तालुक्यात शेतकऱ्यांना चारा मिळेल. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
भराड़ी परिसरात मजुरांना काम नाही.रोजगार हमीची कामे अजुन सुरु झाली नाही कामाच्या शोधात मंजूर परजिल्ह्यात जात आहे. खरीप तर गेला... रब्बीही नाही. तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे.
सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर असला तरी प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना अद्यापही सुरू झाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्याकडुन नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान आठवडी बाजारात गाय, बैल, म्हैस विक्रीची इच्छा नसतानाही नाईलाजाने विक्री करावी लागत आहे.
मुलासारखे जपलेली बैलजोडी...दुष्काळी परिस्थिती भीषण चारा टंचाई जनावरांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाल्याने बैलजोडी विक्रीची इच्छा नसतानाही मुलासारखे जपलेली बैलजोडी कवडीमोल भावाने विक्री करावी लागली.- नाना जिजा शेजुळ.शेतकरी रा. उपळी. ता. सिल्लोड.
व्यापारी झाले कसाई....माझ्याकडे चारा नाही..आगामी 6 महीने जनावरांचे पोट कसे भरावे यांची चिंता सत्तर हजार रुपयांच्या बैलजोडीची व्यापा ऱ्या नी केवळ चाळीस हजार रुपयांत बोली लावली आहे.जनावरे विकने नाइलाज झाला आहे. ज्यास्त जनावरे बाजारात आल्याने व्यापारी कसाई झाले आहे.. त्यानी कमी भावात जनावरे मागितली.. ना इलाजाने ती विकावी लागली.- सोमनाथ रामभाऊ गुंजाळ. रा मांडगाव. ता. सिल्लोड