औरंगाबाद : यंदाच्या वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या आयोजनावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे यावर्षीचा महोत्सव होणे अशक्य असून, प्रशासकीय पातळीवरील हालचाली मंदावल्या आहेत.
२०१४ पासून आजवर एकाच वर्षी हा महोत्सव झाला. गेल्या वर्षीचा महोत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. यावर्षीही महोत्सव रद्द होण्याचीच जास्त शक्यता वाटू लागली आहे. मराठवाड्यातील बहुतांश भाग दुष्काळाच्या रेट्याखाली असून, औरंगाबाद जिल्हादेखील दुष्काळाच्या छायेखाली आलेला आहे. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावेत की न करावेत, यावरून प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असे मत काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
वेरूळ-अजिंठा हा सांस्कृतिक महोत्सव १५ जानेवारी २०१८ च्या आसपास होण्याची शक्यता विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्या वर्षी वर्तविली होती. सीताफळ, रेशीम महोत्सवानंतर त्याबाबत नियोजन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खाजगी संस्थेऐवजी तो महोत्सव एमटीडीसी व विभागीय प्रशासनाच्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु नियोजनासाठी वेळ न मिळाल्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये महोत्सवाचे आयोजन करता आले नाही.
१० वर्षांत आठ वेळा महोत्सव रद्द २००१ पासून वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणारा हा महोत्सव विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात आयोजित करण्यात येऊ लाागला. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमित होत गेला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणांमुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर दहा वर्षांत आठ वेळा सदरील महोत्सव रद्दच करावा लागला.
यावर्षी रद्द झाला महोत्सव२००८- मुंबई दहशतवादी हल्ला२००९- स्वाईन फ्लूची साथ२०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणूक२०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द२०१४- दुष्काळामुळे रद्द२०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द२०१७- नियोजन होऊ शकले नाही२०१८- आयोजनावर दुष्काळाचे सावट