वाळूज महानगर : वाळूज महानगरातील सधन समजल्या जाणार्या ग्रामपंचायती रहिवाशांना पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्यास अपयशी ठरल्या आहेत. पैसा असूनही नियोजन नसल्यामुळे गावातील नागरी प्रश्न सुटत नाहीत. वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या रांजणगाव शेणपुंजी, घाणेगाव, जोगेश्वरी, वाळूज, वळदगाव, वडगाव आदी ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या श्रीमंत म्हणून ओळखल्या जातात. या ग्रामपंचायतींना विविध नागरी करांसह कारखान्यांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीकडूनही विविध विकासकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी त्यांना प्राप्त होतो. बर्याच विकासकामांसाठी खासदार व आमदार निधीतून मदत होत असते. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडून प्रलंबित प्रश्न व विकासकामे करण्यासाठी बरीचशी मदत मिळत असते. राज्य व केंद्र शासनानेही ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजना राबविण्यासाठीही ग्रामपंचायतींना वेगवेगळ्या योजनांमार्फत निधी मिळत असतो. औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तरीही या औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे मागासलेपण दूर झाल्याचे दिसत नाही. पाणी, रस्ते, ड्रेनेज, कचरा, पथदिवे आदी प्रश्न ग्रामपंचायतींपुढे उभे आहेत. जोगेश्वरी ग्रामपंचायतीला तर आयएसओ नामांकन असले तरी या गावातील नागरिक पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. या ग्रामपंचायतींची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी स्थानिक व गटातटांच्या राजकारणामुळे गावातील विकासकामे खुंटली आहेत. गावाच्या राजकीय गटबाजीचा फटका मात्र, गावकर्यांना सहन करावा लागत आहे.
सधन ग्रा.पं.मध्ये सुविधांचा दुष्काळ
By admin | Published: May 19, 2014 1:16 AM