औरंगाबाद : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा रबीची पेरणी कमी होत आहे. भविष्यातील पिकांची शाश्वती नसल्याने बाजारपेठेत डाळींचे भाव भडकण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात उडीद डाळ, मूग डाळ व हरभरा डाळीचे भाव चक्क १ हजार रुपयांनी वधारले आहेत. मागील वर्षभरात एवढी मोठी वाढ झाली नव्हती. सध्या साठेबाज सक्रिय झाल्याने ही मोठी भाववाढ झाली आहे.
खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने मूग, उडीद, तुरीच्या पिकाचे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. अडत बाजारात येणाऱ्या मूग व उडदाची आवक महिनाभरात संपली. यंदा मूग व उडदाचा साठा कमी राहणार हे लक्षात घेऊन बाजारात भाववाढीला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात उडीद डाळीच्या भावात १ हजार रुपयांची तेजी येऊन ती ६,३०० ते ६,६०० रुपये प्रतिक्विंटल विकली गेली. म्हणजे क्विंटलमागे १ हजार रुपयांनी भाववाढ झाली. बाजारात तुरळक प्रमाणात तुरीची आवक सुरू झाली आहे.
मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे उत्पादन ६० टक्के कमी असल्याच्या वार्तेमुळे १ हजार रुपयांनी महागून जुन्या तूर डाळीचा दर ५,९०० ते ६,३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कर्नाटक राज्यातील नवीन तूर स्थानिक बाजारपेठेत येणे सुरू झाले आहे. ५,५०० ते ५,७०० रुपये क्विंटलने ही नवीन तूर विकली जात आहे. मागील वर्षी सुरुवातीला नवीन तुरीचे भाव ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलदरम्यान होते. त्या तुलनेत सध्या तुरीचे भाव कमी आहेत. पाऊस कमी पडल्याने भूजलपातळी घटली आहे. विहिरीतही पाणी नाही.
याचा परिणाम हरभऱ्याच्या पेरणीवर होत आहे. भविष्यात हरभऱ्याची शाश्वती नसल्याने दिवाळीआधी ४,८०० ते ५,००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारी जुनी हरभरा डाळ आज ५,८०० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाली, तसेच मुगाचेही उत्पादन घटल्याने मूग डाळीच्या भावात ५०० रुपयांनी वाढ होऊन ६,८०० ते ७,३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. मसूर डाळही ३०० रुपयांनी वधारून ५,००० ते ५,३०० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे. भाववाढीचा फायदा दालमिल व व्यापाऱ्यांना होत आहे. सरकारने उपाययोजना न केल्यास डाळीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाईच्या खाईत अगोदरच चटके सहन करणाऱ्या नागरिकांना आणखी त्रास होणार आहे.
गहू, ज्वारी तेजीत गहू उत्पादक राज्य मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये रबीची पेरणी कमी होत असल्याची बातमी पसरताच गव्हाचा भाव क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांनी वधारला आहे. मंगळवारी २,४०० ते २,८५० रुपये प्रतिक्विंटलने परराज्यातील गहू विक्री झाला. मराठवाड्यात रबी ज्वारीची पेरणी कमी होत आहे. परिणामी, ज्वारीचा जुना साठा कमी होत असल्याने २०० ते ३०० रुपयांनी भाववाढ होऊन ज्वारी २,६०० ते ३,२०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाली. हळूहळू थंडी वाढत असून, बाजरीला मागणी वाढू लागली आहे. बाजरी २,१०० ते २,३०० रुपये क्विंटलने भाव स्थिर होते. मध्यंतरीच्या काळात बाजरीची विक्री कमी झाली होती. आता परिस्थिती बदलत असून, बाजरी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे...........