औरंगाबाद : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीचा शासन निर्णय निघाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी परीक्षा शुल्काची वसुली थांबविण्याचे आदेश देत माफीचे परिपत्रक काढले आहे. तरीही शुल्कवसुली सुरूच असल्याचे निवेदन मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरूंना देण्यात आले आहे.
शासन निर्णय काढण्यात आल्यानंतरही विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काची वसुली केली आहे. ही बाब मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास लक्षात आणून देण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एक परिपत्रक काढून परीक्षा शुल्क न घेण्याचे आदेश दिले. यानंतर विधि महाविद्यालयांनी शुल्क घेणे थांबविले होते.
शुल्क न घेता परीक्षा अर्ज भरून घेण्यात येत आहेत; मात्र आॅनलाईन फॉर्म भरण्यातील शुल्कमाफी अद्यापही सुरू आहे. याचवेळी परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असल्याचे सांगून अर्ज, गुणपत्रिका, कॅप, एपी शुल्क आकारण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क द्यावे लागत असल्याचे मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरूंना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.