औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांची जीवनवाहिनी आणि आधारवड अशी ओळख असलेल्या घाटी रुग्णालयात वर्ग एक ते चारपर्यंतच्या तब्बल ८४४ जागा रिक्त आहेत. वर्षानुवर्षे रिक्त जागा भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे, तर कार्यरत डॉक्टरही पळविण्याचा ‘उद्योग’ केला जात आहे. त्यामुळे रिक्त जागांनी घाटी रुग्णालयच ‘सलाईन’वर असून, अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावरच रुग्णसेवा देण्याचा ताण सहन करावा लागत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. त्यातच डॉक्टर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे रुग्णसेवेला फटका बसत आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल ३०४ पदे रिक्त आहेत. पैकी रुग्णालयातील २६९ पदे रिक्त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची ६, सहयोगी प्राध्यापकांची १८, सहायक प्राध्यापकांची ९ रसायनशास्त्रज्ञ व जीवरसायनशास्त्रज्ञ यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे, तर रुग्णालयात प्राध्यापकांची २, सहयोगी प्राध्यापकांची ४, प्राध्यापक-प्राचार्य, प्राध्यापक-उपप्राचार्य, मानवसेवी प्राध्यापक यांचे प्रत्येकी एक, सहायक प्राध्यापकांची ४, सहयोगी प्राध्यापकाचे १, अधिव्याख्याताची २, मुख्य निवासी, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी यांची १७ पदे रिक्त आहेत. परिचर्या संवर्गातील १३१ पदे रिक्त आहेत. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवा देण्याचा ताण वाढत आहे.
११७७ खाटा अन् १५०० रुग्णघाटी रुग्णालयात ११७७ खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात १५०० रुग्णांवर उपचार होतात. एकट्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १९०० ते २२०० रुग्ण येतात, तर आंतररुग्ण विभागात ७०० ते ९०० रुग्ण दाखल होतात, तर दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. रुग्णसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु खाटांअभावी जमिनीवर गादी टाकून उपचार करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर येत आहे.
डॉक्टर पळवले, परत दिलेच नाहीतघाटी, कर्करोग रुग्णालयातील सहयोगी आणि सहायक प्राध्यापक असे १२ डॉक्टर आॅगस्टमध्ये जळगावला पळविण्यात आले. यात बालरोगचिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, रोगप्रतिबंध, क्ष-किरणशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, विकृतीशास्त्र विभागांतील डॉक्टरांची बदली झाली. त्यांच्या जागी अद्यापही कोणी डॉक्टर आलेले नसल्याची माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली.
या विभागांवर ताण घाटीतील मेडिसिन विभागात रुग्णसेवेचा सर्वाधिक ताण आहे. त्यापाठोपाठ प्रसूती विभाग, बालरोग, नवजात शिशू विभागात रुग्णसेवेचा भार अधिक आहे.
ताण वाढलाशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागा रिक्त आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ताण वाढला आहे. विशेषत: मेडिसिन विभागावर हा ताण अधिक आहे. तरीही शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बदली होऊन गेलेल्या डॉक्टरांच्या जागेवर अद्याप कोणी आलेले नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्थितीपदे मंजूर भरलेली रिक्तवर्ग- १ व २ ३६९ २९१ ७८वर्ग-३ १५०६ १०४४ ४६२वर्ग-४ ८६८ ५६४ ३०४एकूण २७४३ १८९९ ८४४