औरंगाबाद : सुनेला चार मुलेच झाली. त्यातील दोन जिवंत राहिली, दोघांचा मृत्यू झाला. तरीही सासूला मुलगी हवी होती. त्यामुळे धूत हॉस्पिटलसमोर असलेल्या झोपडीत झाेपलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण ( Kidnapping ) केले. या अपहरण केलेल्या मुलीला जालना येथील लालबाग झोपडपट्टीत नेण्यात आले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी या घटनेचा छडा लावत अपहरण झालेल्या चिमुकलीला शोधून आई-वडिलांच्या ताब्यात दिले. ( due to four children were born, Three year girl was abducted as he wanted a daughter)
वडील कामानिमित्त गावी गेल्यामुळे धूत हॉस्पिटलसमोर असलेल्या झोपडीत आई आणि सहा महिन्यांच्या भावासोबत झोपलेल्या तीन वर्षीय दीपाली राहुल इंगळे या चिमुकलीचे १२ ऑगस्टच्या मध्यरात्री अपहरण केले होते. घाबरलेल्या आईने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात मध्यरात्री मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. तेव्हाच गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक मीरा लाड व पोलिसांच्या पथकाने दीपालीच्या शोधासाठी परिसरातील झोपड्या पिंजून काढल्या होत्या. मात्र ती काही सापडली नाही.
पोलीस शिपाई देवीदास काळे यांनी दोन दिवस मेहनत घेत स्मार्ट सिटीच्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यातून सीसीटीव्ही फूटेज गोळा केले. यातून मुलीचे अपहरण एका ॲाटो रिक्षातून झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी जालना येथील देऊळगाव राजा रोडवरील लालबाग झोपडपट्टीत असल्याचे समजले. यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ नागरे यांच्यासह देवीदास काळे, दया ओहळ, अविनाश दाभाडे यांच्या पथकाने जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची मदतीने लालबाग झोपडपट्टीत अपहरण करण्यासाठी वापरलेली रिक्षा शोधून काढली.
याच परिसरात राहणाऱ्या वनमाला मुन्नालाल शर्मा (५२) व राधा रवी शर्मा (२७, रा. लालबाग झोपडपट्टी, राजीवनगर, जालना) या दोघींनी मुलीचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. तसेच मुलगीही त्यांच्याकडेच आढळून आली. या दोघींना पोलिसांनी अटक करून औरंगाबाद येथे आणले. मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीला पाहताच तिच्या आईने हंबरडा फोडला. या मुलीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक अमरनाथ नागरे, मीरा लाड, पवन इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सासूला हवी होती मुलगीचलालबाग झोपडपट्टीत दारूचा व्यवसाय करणाऱ्या वनमाला शर्मा हिची सून राधा शर्मा हिला चार मुले झाली होती. मुलगी झालीच नाही. सासू असलेल्या वनमाला हिला नात पाहिजे होती. सुनेला मुलगी होत नसल्यामुळे औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातून जालनाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीतल्या तीन वर्षीय मुलीचे दोघी सासू-सुनेने अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीचा अवैध दारू विक्रीचा व्यवसायमुलीचे अपहरण करणाऱ्या वनमाला शर्मा या महिलेवर जालना येथील सदर बाजार येथील पोलीस ठाण्यात अवैध दारू विक्रीचे तीन-चार गुन्हे दाखल असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पाेलिसांनी दिली. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींनी मुलीचे अपहरण केले नसून, ही मुलगी रस्त्यावर झोपलेली सापडली असल्याचा दावा केल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.