औरंगाबाद : वैशाखातील वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल, टोपी, स्कार्फ, गॉगल या साधनांचा वापर केला तरी तो अपुरा ठरतो. वाढती उष्णता आणि त्याला कचरा जाळल्यामुळे मिळालेली प्रदूषित हवेची जोड यामुळे सध्या त्वचारोगांचे प्रमाण वाढले आहे.
कचरा जाळल्यामुळे शहराच्या प्रदूषणाच्या पातळीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने एप्रिल अखेरीस प्रकाशित केले होते. प्रदूषित हवेचे दुष्परिणाम सध्या सामान्य लोकांना भोगावे लागत असल्याचे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले.उन्हाळ्यात हवा कोरडी झालेली असते. यामुळे या दिवसांमध्ये धुळीचे प्रमाण वाढते. यासोबतच शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे मध्यंतरी कचरा जाळण्याचे प्रमाणही वाढले होते. या कचऱ्यात प्लास्टिक, रबर यांसारखे हानिकारक पदार्थही असतात. साध्या कचऱ्यासोबत हे पदार्थ जळाल्यामुळे हवेत सल्फर, डायआॅक्सिजन यासारखे आरोग्यावर दुष्परिणाम करणारे घटक हवेत मिसळत आहेत.
त्यामुळे आधीच उन्हाचा तडाखा आणि त्यात प्रदूषित हवेची पडलेली भर यामुळे त्वचाविषयक आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे हवा कोरडी होते. त्वचेचे हायड्रेशन सुरळीतपणे होत नाही. यामुळे त्वचा शुष्क होते, अशी शुष्क त्वचा तीव्र उन्हाच्या माऱ्यामुळे करपते यालाच वैद्यकीय भाषेत सनबर्न म्हणतात. यामध्ये त्वचा पूर्णपणे काळी पडते आणि या भागाला खाज येते. हे टाळण्यासाठी शक्यतो उन्हात फिरू नये.
प्रदूषणच जबाबदारसनबर्नच्या रुग्णांसोबतच अंगावर पुरळ, पिवळसर असलेले मोठे फोड, मोठ्या आकाराचे लालसर फोड अशा त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या समस्येसाठी सर्वतोपरी हवेमध्ये असणारे प्रदूषणच जबाबदार आहे. कचरा जाळण्याचे परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. कचरा जाळताना कचऱ्यातील घातक पदार्थांचा स्फोट होऊन चेहरा, हात-पाय जळाल्यामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही सध्या वाढले आहे, अशी माहिती डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी दिली.