- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : इंदूर महापालिकेने शहर स्वच्छतेअंतर्गत ८५ वॉर्डांमधील तब्बल ९०० कचराकुंड्या गायब केल्या. सार्वजनिक ठिकाणी कुठेच कचरा साचणार नाही याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते धूळकणांनी मुक्त करण्यात आले. या स्वच्छतेचे परिणामही शहरवासीयांना दिसून येऊ लागले आहेत. मागील वर्षभरात २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. दमा आणि साथरोगांच्या आजाराचे प्रमाणही नगण्य झाल्याचा दावा महापौर तथा माजी आमदार मालिनी गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
स्वच्छ भारत अभियानात काहीही करून इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा अशी शपथच घेण्यात आली होती. तब्बल १५ हजार वर्ग मीटरपर्यंत शहरातील सर्व सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. प्रत्येक चौकात, वॉर्डांमधील अवैध पोस्टर्स, बॅनर हटवून स्वच्छतेचे फलक लावण्यात आले. विविध संस्था, संघटना, शाळांमध्ये जाऊन नागरिकांना शपथ दिली. या जनचळवळीचे परिणाम आम्हाला त्वरित दिसून येऊ लागले, असे अत्यंत आनंदात मालिनी गौड सांगत होत्या. शहरातील रस्त्यांची रात्री २० मशीनद्वारे सफाई होते. शहरातील ४२ टक्केधूळ-कणांचे प्रमाण घटले. त्यामुळे दम्याच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. स्वच्छतेमुळे डास आणि माशांही गायब झाल्या.
कठोर निर्णय घेतलेशहरातील लाखो नागरिकांची महापालिकेला साथ मिळू लागताच काही कठोर निर्णयही घेण्यात आले. प्रत्येक चौकात बसणाऱ्या जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात आला. ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची ही जनावरे होती त्यांचे अवैध बांधकामे पहाटे पाच वाजता महापालिकेने जमीनदोस्त केली. त्यामुळे शहरात मनपाबद्दल दहशत निर्माण झाली. या कामात मनपा खूपच गंभीर आहे, असे नागरिकांनाही वाटले. महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षांनीही या कामात आम्हालाच मदत केल्याचे त्यांनी प्रांजळपणे नमूद केले.
( इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च )
स्मार्ट शहरांमध्येही बाजी मारणारशहरातील मलनिस्सारणापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राची मदत घेतली आहे. अणु किरणोत्सर्गचा वापर करून मानवी विष्ठेवर प्रक्रिया करण्यात येईल. अहमदाबादनंतर देशातील हा दुसरा प्रकल्प ठरणार आहे. प्लास्टिकपासून डांबरनिर्मिती, मानवीय केसांपासून खतनिर्मिती, हेल्मेट सक्ती, नद्यांना गतवैभव प्राप्त करून देणे आदी अनेक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत इंदूर शहर सध्या ७ व्या क्रमांकावर आहे. काही दिवसांमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घ्यायची आहे.
आयुक्तांचा सिंहाचा वाटामहापालिका आयुक्त मनीष सिंह यांनी शहर स्वच्छतेत खरोखरच सिंहाचा वाटा उचलला. १४ ते १६ तास ते काम करीत असत. महापौर आणि आयुक्त यांच्यात समन्वय असेल तरच शहराचा निश्चितच कायापालट होऊ शकतो, असेही महापौरांनी नमूद केले.
मनपातील भ्रष्टाचार संपविलामी महापौर होण्यापूर्वी आमदार होते. मध्यप्रदेश शासनात मंत्री असलेल्या यजमानाचे अपघाती निधन झाले. परिस्थितीने मला महापौरपदावर आणले. सर्वप्रथम महापालिकेतील भ्रष्टाचार मुळापासून संपविला. ही शहराच्या यशाची सर्वात मोठी आणि जमेची बाजू ठरली.मालिनी गौड, महापौर