लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : शहरातील बसस्थानकाची अवस्था बकाल झाली असून परिसरात स्वच्छता न ठेवल्यामुळे या स्थानकाला कचराकुंडीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे बसस्थानकावर ये-जा करणाºया प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या बसस्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी खडीचा वापर न करता केवळ मातीचाच वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बसस्थानकात एसटी बसने प्रवेश करताच धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे प्रवाशांच्या आजाराला निमंत्रण मिळत आहे. धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच बसस्थानकातील प्रवाशांना बस ओळखता यावी, यासासाठी स्थानकातील फलाटावर शहरांची नावे असलेले फलक लावण्यात आले आहेत. मात्र फलाट क्रमांक १ वरील गावांच्या नावाचा फलकच गायब झाला आहे.बसस्थानकात बस थांबण्यासाठी सहा फलाट उभाण्यात आले आहेत. मात्र बसचालक आपली बस फलाटावर न लावता १०० फूट दूरच उभी करतात. यामुळे वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुले यांना दूरवर जाऊन बसमध्ये चढावे लागते. घाई, गडबडीत अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असल्याने बसस्थानकातील फलाट नावालाच असल्याचे दिसून येत आहे. येणाºया प्रवाशांना बसच्या वेळा लक्षात येण्यासाठी लावण्यात आलेले बसचे वेळापत्रक मागील दोन ते तीन वर्षापूर्वीचे आहे. सद्य स्थितीत बसच्या वेळा बदललेल्या असताना बसस्थानकात जुनेच वेळापत्रक असल्याने बस पकडताना प्रवाशांची तारंबळ उडत आहे.अनेक वेळा प्रवाशांना बसस्थानकातच ताटकळत बसावे लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन बसस्थानकात मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशातून होत आहे. परंतु, या प्रकाराकडे मानवत येथील एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मानवत बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 11:42 PM