विकास राऊत
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत येणाऱ्या ऑरिक इंडस्ट्रीयल टाऊनशिप लि.(एआयटीएल) मधून जयपूर-भांबर्डा येथे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या इंटरचेंजमुळे वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढेल. एकप्रकारे समृद्धी महामार्ग डीएमआयसीमार्गे जालना रोडलाच जोडला जाणार आहे. यामुळे औद्योगिक वातावरणाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
समृद्धी महामार्ग प्रस्तावित इंटरचेंजमुळे डीएमआयसीमार्गे थेट जालना रोडलाच जोडला जाणार असल्यामुळे आज जरी डीएमआयसीत उद्योगांची मोठी गुंतवणूक नसली तरी भविष्यात गुंतवणूक वाढल्यास वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होईल.
जालना रोडवरून बीड व इतर जिल्ह्यांतून येणारी वाहतूक डीएमआयसीमार्गे इंटरचेंजवरून मुंबई किंवा नागपूरकडे वळेल. यामुळे वाहतुकीची कोंडी होणे शक्य आहे. सोबतच जालन्याकडून येणारी, चिकलठाण्यासह नवनगरमधून जाणारी आणि शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी व येणारी वाहतूक याच इंटरचेंजचा वापर करू लागल्यास डीएमआयसीतील सर्व रस्ते वाहनांच्या गर्तेत येतील.
जालना ड्रायपोर्ट, मुंबई ते नागपूर, त्यातच डीएमआयसीतील वाहतूक, शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक या इंटरचेंजचा वापर करील. त्यामुळे ऑरिक सिटी परिसर हा प्रचंड वाहतुकीच्या विळख्यात येईल. औद्योगिक वसाहत वाहतुकीच्या वर्दळीत आल्यास त्याचे गुंतवणुकीवर मोठे परिणाम होतील. डीएमआयसीच्या उत्तर बाजूने साधारणत: पाऊण किलोमीटरवर समृद्धी महामार्गावरून इंटरचेंज कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. यामुळे जालना रोडमार्गे डीएमआयसी ऑरिक सिटीत इंडस्ट्रियल दळणवळण वाढून वाहतुकीची कोंडी वाढेल.
चाकण आणि तळेगाव येथे काय झाले
चाकण औद्योगिक वसाहत ते तळेगाव येथे औद्योगिक वसाहतीत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्याला कारण म्हणजे औद्योगिक आणि सार्वजनिक वाहतुकीची कनेक्टिव्हिटी एकत्र असणे आहे. असाच प्रकार डीएमआयसीत इंटरचेंजमुळे आगामी काळात होण्याची शक्यता आहे. नाशिक महामार्ग व तळेगाव, मुंबई महामार्गावर वाहतूक खोळंबत असल्याने ४५ कि.मी.चा नवीन रस्ता एमआयडीसीने तेथे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमआयसीत वाहतुकीची कोंडी वाढली तर पुन्हा नवीन रस्ता बांधावा लागेल.
औद्योगिक गुंतवणुकीवरही परिणामाची शक्यता
चाकण आणि तळेगावमध्ये नव्याने गुंतवणूक वाढू लागली आहे. औद्योगिक वाहतुकीवर परिणाम झाल्यास या गुंतवणुकीबाबत साशंकता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन मार्ग उभारणीकडे एमआयडीसीने लक्ष केंद्रित केले आहे. असाच प्रकार इंटरचेंज कनेक्टिव्हिटीमुळे डीएमआयसीत होऊन वाहतुकीची कोंडी वाढली तर गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट...
इंटरचेंजवरून होत असलेले दावे असे
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन यांनी दावा केला, सध्या तरी डीएमआयसीतून जोडण्यात येणाऱ्या इंटरचेंज रस्त्याचा शहरी वाहतुकीवर परिणाम होणार नाही. दहा वर्षांनंतर वाहतूक वाढेल, त्यानंतर परिणाम जाणवू शकेल. ४२ कोटींची रक्कम एमएसआरडीसीकडे वर्ग केल्याचेही त्यांनी सांगितले. ऑरिकमधून इंटरचेंज औद्योगिक वाहतुकीसाठीच केला जात आहे. औरंगाबादमध्ये इतर इंटरचेंज सामान्य वाहतुकीसाठी उपलब्ध असतील. शेंद्रा, चिकलठाणा, करमाड, बदनापूर परिसरातील वाहतुकीसाठी या इंटरचेंजचा फायदा होईल, तर डीएमआयसीचे सहसंचालक जितेंद्र कास्तुके यांनी दावा केला की, डोमॅस्टिक वाहतुकीचा राबता त्या इंटरचेंजमुळे वाढणार नाही, असे वाटते.