औरंगाबाद: उस्मानपु-यातील युनिक अॅॅटो पेट्रोलपंपावर इंधन भरणा-या वाहनचालकांना भेसळयुक्त पेट्रोल-डिझेल मिळाल्याने अनेकांच्या गाड्या रस्त्यात बंद पडू लागल्या. शेवटी इंधन काढून पाहिले असता पेट्रोलमध्ये पाणी आढळले. यानंतर संतप्त वाहनचालकांनी गुरूवारी दुपारी पंपव्यवस्थापनाला जाब विचारल्याने गोंधळ उडाला.
याविषयी अधिक माहिती अशी की, उस्मानपुरा येथील गोपाल टी जवळ मे युनीक अॅटो नावाचा पंप आहे. या पंपावर बन्सीलालनगर येथील रोहित धूत यांनी त्यांच्या दुचाकीमध्ये शंभर रुपयांचे पेट्रोल भरले. यानंतर ते पंपावरून एक ते दोन किलोमिटरपर्यंत गेल्यानंतर गाडी अचानक बंद पडली. गाडी सुरू झाली की सारखी बंद पडायची यामुळे त्यांनी इंधन टाकीत एअर अडकला असेल असे समजून एका पाण्याच्या प्लास्टीक बाटलीत इंधनटाकीतील पेट्रोल काढले असता बाटलीत पाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
देवगिरी कॉलेजमध्ये शिकत असलेला आकाश पवार(रा.बीड)यानेही सकाळी त्याच्या दुचाकीत इंधन टाकले असता त्याची दुचाकीही सारखी बंद पडू लागल्याने त्यांनेही एका बाटलीत गाडीतील पेट्रोल काढून पाहिले असता त्यात बाटलीच्या तळाशी पाणी साचल्याचे दिसले. अभिजीत अरकीलवार यालाही आल्याचे त्यांनी सांगितले. तर मयुर पाटील यांनी त्यांच्या कारमध्ये याच पंपावरून इंधन टाकले. गाडी सारखी बंद पडू लागल्याने त्यांनी कशीतरी गॅरेजवर नेली. यावेळी गॅरेजवाल्याने त्यांना इंधनमध्ये भेसळ असल्याचे सांगितले. याशिवाय ज्या लोकांनी या पंपावर इंधन भरले त्याबहुतेक सर्वांना पाणीमिश्रीत इंधन मिळाल्याच्या तक्र ारी घेऊन शंभरहून वाहनचालक गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास युनीक अॅटो पंपावर गेले. यावेळी पंपाच्या केबिनमध्ये बसलेल्या व्यवस्थापकांकडे याविषयी तक्रार केली असता तेथील कर्मचा-यांनी तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तक्रारदार संतप्त झाले, यातून वाहनचालक आणि कर्मचारी यांच्यात गोंधळ वाढू लागला.