हिंगोली : अपंग व्यक्तींचे जीवनमान उंचावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात ३१ डिसेंबर रोजी शासनाने अनुसूचित जातीमध्ये असलेल्या अपंगांसाठी दारिद्र्य रेषेची अट शिथिल केली. मात्र माहितीअभावी लाभार्थ्यांची भटकंती सुरू आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील अपंग व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली नसल्यास त्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे या लाभार्थ्यांनाही हक्काचा निवारा असावा, यासाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. याबाबत शासनाने निर्णय घेऊन ठरवून दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अपंगांना संबंधित विभागामार्फत योजनेचा लाभ देण्याचे डिसेंबर २०१५ मध्ये आदेश दिले. परंतु जिल्हा स्तरावर याबाबत अधिक नियोजन झाले नाही. त्यामुळे अपंगांना योजनेच्या लाभासाठी कुठल्या कार्यालयाकडे अर्ज करावे, याबाबत माहिती नाही. परिणामी, त्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि. प. समाजकल्याण विभाग व सामाजिक न्याय भवनाकडे चकरा माराव्या लागत असल्याचे दिसून येत आहे.याबाबत एका लाभार्थ्यास विचारले असता नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, मागील महिनाभरापासून योजनेच्या लाभासाठी चकरा माराव्या लागत आहेत. माहितीच मिळत नाही. त्यामुळे संबधित विभागाने जनजागृतीसाठी बैठका घेणे आवश्यक आहे. जेणेकरून पात्र अपंगांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवता येतील. तसेच त्यांची गैरसोय टळेल. (प्रतिनिधी)
माहितीअभावी अपंगांचे घरकुलाचे स्वप्न भंगतेय
By admin | Published: February 17, 2016 10:48 PM