औरंगाबाद: देवळाई परिसरातील महसुली कारभारासाठी कायम तलाठी नसल्याने, नागरिकांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
मालमत्ता, तसेच शेतीविषयक कामे लांबणीवर पडत आहेत. मनपात भाग समाविष्ट झाला असला, तरी परिसरातील विविध मालमत्तांच्या कामासह पीककर्ज, तसेच पेरेपत्रकांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. बहुतांश शेतीचे रूपांतर सिमेंटच्या जंगलात झालेले आहे. टोलेजंग इमारती उभा राहिल्यास सदनिकांच्या व्यवहारासाठीही नागरिकांना तलाठी कार्यालयावर अवलंबून राहावे लागत आहे.
प्रभारीवरच कारभार किती दिवस
देवळाईचा कारभार पंढरपूर व सिंदोन, बिंदोन, तसेच इतर कोणत्याही तलाठ्याकडे दिला जातो. लाचेच्या प्रकरणात येथील तलाठी अडकल्यापासून नवीन कायमस्वरूपी तलाठी अद्याप आलेला नाही. अशा दोन घटना घडल्याने, येथील कारभार सातत्याने प्रभारीकडेच देण्यात येत आहे. कायमस्वरूपी तलाठी देण्याची गरज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मालमत्तांची कामे आडकली...
अनेक व्यावसायिकांच्या मालमत्तांच्या नोंदी घेण्यासाठी नागरिकांना फिरावे लागत आहे. बँकेचे व्यवहार करण्यासाठी सातबाऱ्यावर मालमत्ताची नोंदणी व इतर कामासाठी तलाठी असणे गरजेचे आहे. त्यावर लक्ष दिले जात नाही, असे हकीम पटेल, हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची कामे रेंगाळली...
शेतकऱ्यांना पीककर्ज व इतर पेरेपत्रक, तसेच इतर कामासाठी तलाठी कार्यालयात महत्त्वाची कामे असतात. खरीप हंगाम सुरू झाल्याने, त्यासाठी शेतकरी बँकांकडून कर्ज काढण्यासाठी लागणारी कागदपत्र मिळत नसल्याने, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. महसूल विभागाने दखल घेऊन देवळाई भागासाठी कायमस्वरूपी तलाठी देण्याची गरज आहे, याविषयी महसूल विभागात अधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहोत, असे माजी सरपंच करीम पटेल यांनी सांगितले.
- लॉकडाऊनमध्ये विविध मालमत्तांचे व्यवहार रखडले.
- नागरिकांच्या तलाठी कार्यालयावर होतात फेऱ्या.
- उद्या या, आज दुसऱ्या सजावर तलाठी आहेत.
- बँकासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र रखडली.
- प्रभारी तलाठी कधी येणार असाच प्रश्न नागरिकांना पडतो.
- सातबाऱ्यावर नोंदीसाठी उशीर होत आहे.