गतवर्षी १९ जूनपर्यंत ५२ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले होते. यंदा मात्र १ जूनला हजेरी लावल्यानंतरही पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पैठण तालुक्यात खरिपाच्या पिकाखाली एकूण १,०९,०५० हेक्टर क्षेत्र येते. यापैकी सिंचनाची सोय असलेल्या १०,९०० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्रावर अद्यापही पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. सलगपणे १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला, तरच पेरणीस प्रारंभ करता येईल. हवामान खात्याने येत्या चार दिवसांत चांगले पर्जन्यमान होईल, असे भाकीत वर्तविले असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सोयाबीन पिकाखाली पैठण तालुक्यात सरासरी १,२६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असते. यंदा मात्र या पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन, तीन वर्षांपासून मका पिकाला भाव नसल्याने व सोयाबीनला ८ ते १० हजारांपर्यंत अनपेक्षित भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला आहे. दरम्यान, पेरणीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी बियाणे, खते खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.
पैठण तालुक्यात आतापर्यंत
सरासरी ५६.९० मि.मी. पावसाची नोंद
तालुक्यात आतापर्यंत सरासरी ५६.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत १२७.५० मि.मी. पाऊस पडला होता. दहा महसूल मंडळांपैकी विहामांडवा मंडळात सरासरी ९० मि.मी. असा बऱ्यापैकी पाऊस झाला असून, येथे शेतकरी पेरणी करीत आहेत. ढोरकीन, पाचोड, बालानगर या महसूल मंडळांत मात्र सरासरी ४० मि.मी.पेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.