वाळूज महानगर : जोगेश्वरीत पाईप तोडल्याच्या कारणावरुन झालेल्या हाणामारीत तीनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित नंदलाल नरवडे (२४ रा.जोगेश्वरी) याची रामराई शिवारात गट नंबर ११५ मध्ये शेती आहे. अभिजित २३ जुलै रोजी आई सिंधुबाईसोबत शेतातील पिकांना पाणी देत होता. यावेळी विहिरीवरील पंप बंद केल्यामुळे अभिजितचा चुलता दत्तू नरवडे यांच्याशी वाद झाला. यानंतर दत्तू नरवडे यांनी माय-लेकास शिवीगाळ करुन शेतातील पाईपलाईन तोडुन टाकली.
यानंतर अभिजित याने पोलीस ठाण्यात चुलत्याविरुद्ध तक्रार दिली होती. दरम्यान, दुपारी ३ वाजेच्या सुमारास दत्तू नरवडे यांनी जोगेश्वरीत अभिजितच्या कुटुंबियांची भेट घेऊन हे प्रकरण आपसात मिटवुन घेऊ असे सांगितले. २४ जुलै रोजी दत्तु नरवडे यांचा मामा सुरेश अवधूत याने अभिजितचे दुसरे चुलते भाऊसाहेब यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, तिसऱ्या दिवशी दत्तू नरवडे, सुरेश अवधूत यांनी दोन अनोळखी इसमास सोबत घेऊन अभिजितच्या कुटुंबियासमवेत वाद घालण्यास सुरुवात केली. या भांडणात दत्तु नरवडे यांनी पुतण्यास मारहाण केली. तर सुरेश अवधूत याने लोखंडी रॉडने सिंधुबाई नरवडे यांना मारहाण केली.
यावेळी अवधूत याच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी इसमापैकी एकाने अभिजित याची चुलती नंदाबाई व आई सिंधुबाई यांना मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.