औरंगाबाद : मागील वर्षी मार्चअखेरीस लॉकडाऊन झाले. त्यामुळे महापालिकेची करवसुली घटली. आता पुन्हा लॉकडाऊनचे संकट घोंघावत आहे. उद्या, सोमवार किंवा मंगळवार (दि. ९)पासून लॉकडाऊन लावलेच तर महापालिकेला किमान २५ ते ३० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाला लॉकडाऊन लावताना अनेकदा विचार करावा लागणार आहे.
मागील वर्षी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीतून महापालिकेला १०० कोटी रुपये प्राप्त झाले होते. यंदा तीन ते चार महिन्यांपासून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे मालमत्ताकर आणि पाणीपट्टीची वसुली शंभर कोटींपेक्षा जास्त झाली आहे. ३१ मार्चपर्यंत किमान ५० कोटींचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम करण्यात येत आहे. कोरोना आजाराचा संसर्ग वाढल्याने वसुली किमान २५ ते ३० कोटी रुपये तरी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विविध व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली बाकी आहे. मागील वर्षी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध कार्यालयांनी महापालिकेला कर भरलेला नाही. यंदाही अनेक कार्यालयांकडे कराची रक्कम थकीत आहे. आज, रविवारी प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला तर महापालिकेला मोठ्या आर्थिक संकटाचा मुकाबला करावा लागेल. लॉकडाऊन हळूहळू ३१ मार्चपर्यंत वाढला तर वसुली अजिबात होणार नाही, अशी भीती प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली. आज, रविवारच्या बैठकीतील निर्णयाकडे सर्वसामान्य नागरिकांचे जेवढे लक्ष लागले आहे, तेवढेच लक्ष महापालिकेचेही आहे.
प्रशासनाचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता
मार्चअखेरपर्यंत अपेक्षित उत्पन्न गृहीत धरून प्रशासनाने काही ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. घनकचरा प्रकल्पासाठी महापालिकेचा वाटा म्हणून काही रक्कम टाकण्यात येणार होती. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी योजनेसाठी काही रक्कम देण्यात येणार होती. या दोन मोठ्या कामांना तूर्त बाजूला ठेवण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय राहणार नाही.