औरंगाबाद : पावसाने मोेठी दडी मारल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात मूग व उडदाच्या उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसेच जिल्ह्यात मक्याच्या उत्पादनावरही ५० टक्के, तर २० टक्क्यांनी कपाशीचे उत्पादन घटण्याचा प्रथम पूर्वानुमान अहवाल कृषी विभागाने जाहीर केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ३५ हजार ५८५ हेक्टर आहे. त्यापैकी १२,८६५ हेक्टर, तर उडदाची ५,२४४ हेक्टरवर पेरणी झाली. ऐन शेंगा लागणे व भरण्याच्या अवस्थेत असताना जुलै व आॅगस्टमध्ये ३ ते ४ आठवड्यांचा पावसात खंड पडल्याने दोन्हीची उत्पादकता ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घटली आहे. यंदा १ हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. उत्पादनात ८ ते १० टक्के घट होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांत ज्वारीचे सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ९७८ किलोग्रॅम एवढी आहे, तर यंदा ९२६ किलोग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. खरिपात २ लाख ६ हजार ९९४ हेक्टरवर मका लावण्यात आला. त्यापैकी २२,५६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कणसाची वाढ खुंटली, तसेच दाणे कमी प्रमाणात भरल्याने ४० टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेक्टरी २७ किलोने कापसाचे उत्पादन कमी जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ७७८ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. बोंडअळीचा परिणामही जाणवत आहे. २३ हजार ५९९ हेक्टर क्षेत्र हे पावसाच्या खंडाने बाधित झाले आहे. मागील पाच वर्षांत सरासरी उत्पादन (रुई) हेक्टरी २२७ किलो एवढे झाले आहे. यंदा हेक्टरी २०० किलो होण्याचा प्रथम नजर अंदाज नोंदविण्यात आला आहे.
रबीच्या क्षेत्रात वाढीचे नियोजन औरंगाबाद जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र १ लाख ८९ हेक्टर आहे. त्यापैकी मागील रबी हंगामात १ लाख ६९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदात २ लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी होेईल, असे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. २७ टक्क्यांनी रबीचे क्षेत्र वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.