मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : श्रीमंत थोरात यांना भर उन्हात शेतात राबताना पाहून कोणालाच वाटणार नाही की, अवघ्या एक वर्षापूर्वी त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेली आहे. दुस-या जन्माचा पुरेपूर आनंद घेणा-या थोरात यांनी गेल्या वर्षभरातील अनुभव ‘लोकमत’शी शेअर केले. मुंबईनंतर महाराष्ट्रात प्रथमच औरंगाबादमध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती. ‘मृत्यूच्या दारातून परत येऊन पुन्हा या काळ्या मातीत उभा राहीन असे वाटले नव्हते. केवळ अवयवदानामुळेच हे शक्य झाले’, असे सद्गतीत होऊन थोरातम्हणतात.खानापूर गावचे रहिवासी (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) श्रीमंत थोरात (४६) यांची २०१२ साली बायपासची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर काही वर्षे त्रास झाला नाही. मात्र, २०१६ साली हळूहळू त्रास वाढू लागला. ‘थोडेदेखील काम केले की, दम लागू लागला. शरीर थकून गेल्यासारखे वाटायचे. नंतर-नंतर तर चालणेसुद्धा अवघड झाले. काय होते कळायला काही मार्गच नव्हता’, ते सांगतात.अखेर औरंगाबादेतील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये हृदय निकामी झाल्याचे निदान झाले. त्यावर उपाय केवळ एकच - हृदय प्रत्यारोपण! संपूर्ण आयुष्य खानापूरसारख्या छोट्या गावात काढलेल्या थोरात कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता. घरी दीड- पावणेदोन एकरची तुटपुंजी जमीन. उत्पन्नाचा दुसरा मार्ग नाही, अशा परिस्थितीत हृदय प्रत्यारोपणाचा खर्च कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. दवाखाना आणि काही सामाजिक संस्था त्यांच्या मदतीला धावून आल्या;परंतु त्यांना हृदय मिळत नव्हते. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना ते मिळाले. हृदय प्राप्त झाल्यावर युनायटेड सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही ६ तासांच्या शस्त्रक्रियेतून १ फेबु्रवारी २०१७ रोजी यशस्वी प्रत्यारोपण केले. ‘शस्त्रक्रियेनंतर एक महिना तर मला काही कळत नव्हते; परंतु हळूहळू तब्येत सुधारू लागली, थोरात सांगतात.एप्रिल महिन्यात त्यांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली. विशेष म्हणजे जून महिन्यातच त्यांनी शेतात जाण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शेतातील छोटी-मोठी कामे केल्यानंतर हळूहळू ते मोटारसायकल आणि ट्रॅक्टर चालवू लागले. एवढ्या झटपट त्यांची सुधारणा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. ‘मरता मरता वाचला गडी, भारी काम झाले’ असे गावातील लोक म्हणतात.वैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीमुळे मृत्यूच्या दारातून परत आलेल्या श्रीमंत यांना पाहून लोकांचा अवयवदानाबाबत विचार बदलतो आहे. ‘मला हृदय दिलेल्या भल्या व्यक्तीमुळेच मी माझ्या कुटुंबासोबत पुन्हा जगू लागलो. अवयवदानामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल, तर ते केलेच पाहिजे, असे मी सर्वांनाच सांगतो. त्याचा काय फायदा होतो त्याचे मी जिवंत उदाहरण आहे’, असे थोरात म्हणतात.घरच्यांना पुन्हा बघण्याचे समाधान४हृदय निकामी झाल्याचे कळल्यावर थोरात कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. घरातील कर्त्या पुरुषाने हाय खाल्ल्याने सर्वच खचले. घरी पत्नी नंदाबाई, दोन मुली, दोन मुले, आई-वडील असे त्यांचे कुटुंब. थोरात म्हणाले, ‘माझ्या आजारपणाच्या काळात आम्हाला आर्थिक अडचणी होत्या; पण माझ्या पत्नीने मोठ्या हिमतीने संपूर्ण घर सांभाळले.’४दरम्यानच्या काळात मोठ्या मुलाने बारावीत शिक्षण सोडून शेतीकामात स्वत:ला झोकून दिले. लहान मुलगा यंदा दहावीत असून दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहेत. ‘घरच्यांना पुन्हा एकदा बघण्याची संधी मिळाली याचे खूप समाधान आहे. आता तर मला पहिल्यापेक्षा जास्त चांगले वाटते.’अवयवदान केलेच पाहिजेआपल्या पाठीमागे जर आपले अवयव कोणाच्या कामी येणार असतील, एखाद्याचा जीव वाचणार असेल, कोणाच्या कुटुंबाच्या जीवनात सुख येणार असेल, तर अवयवदान केलेच पाहिजे. मी माझ्या दात्याचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सदैव आभारी आहे.- श्रीमंत थोरात, शेतकरी
अवयदानामुळेच दुसरा जन्म आनंदाने जगतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:44 PM
श्रीमंत थोरात यांना भर उन्हात शेतात राबताना पाहून कोणालाच वाटणार नाही की, अवघ्या एक वर्षापूर्वी त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेली आहे. दुस-या जन्माचा पुरेपूर आनंद घेणा-या थोरात यांनी गेल्या वर्षभरातील अनुभव ‘लोकमत’शी शेअर केले. मुंबईनंतर महाराष्ट्रात प्रथमच औरंगाबादमध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती. ‘मृत्यूच्या दारातून परत येऊन पुन्हा या काळ्या मातीत उभा राहीन असे वाटले नव्हते. केवळ अवयवदानामुळेच हे शक्य झाले’, असे सद्गतीत होऊन थोरात
ठळक मुद्दे‘मेडिकल मिरॅकल’ : गेल्या वर्षी हृदय प्रत्यारोपणातून जीवनदान मिळालेल्या श्रीमंत थोरात यांची मनोभावना