औरंगाबाद : महापालिका प्रशासन दर महिन्याला तीन ते साडेतीन कोटी रुपये विजेचे बिल भरते. चालू महिन्याचे बिल थकले म्हणून गुरुवारी वीज वितरण कंपनीने मनपा मुख्यालय, प्राणिसंग्रहालय, जलतरण तलाव आदी कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित केला. पैसे भरल्यानंतर मुख्यालयाची वीज पुन्हा सुरू करण्यात आली. वीज कंपनीच्या या कृत्याला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. शहरात ५५० पेक्षा अधिक विद्युत रोहित्र मनपाच्या रस्त्यांवर आहेत. वीज कंपनीच्या प्रत्येक उपकेंद्रालाही व्यावसायिक दराने टॅक्स लावण्यात येणार आहे.मनपा आयुक्तडॉ. ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले की, चालू महिन्याच्या थकबाकीसाठी वीज कापणे योग्य नाही. महापालिकेच्या शाळांनाही वीज कंपनी व्यावसायिक दराने बिल देण्यात येते. महापालिकेच्या शाळांमध्ये अत्यंत गोरगरीब घरांमधील विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. शहरात रोहित्रांची संख्या जवळपास ५५० आहे. या रोहित्रांना व्यावसायिक कर लावण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मनपा हद्दीत वीज कंपनीचे जिथे कुठे उपकेंद्र असेल तेथेही आम्ही व्यावसायिक कर लावणार आहोत, असे बकोरिया यांनी सांगितले.सर्वसामान्य नागरिकांनी ज्या विजेच्या पोलवरून वीजपुरवठा घेतला आहे, त्या पोलवर आम्ही कर लावणार नाही. वीज कंपनीकडे आमचे १८ कोटी रुपये थकले आहेत. शहरात जीटीएल कंपनी असताना एलबीटीची ही रक्कम आहे. पैशांचा हा वाद ‘एमईआरसी’मध्ये गेला आहे. मनपाने कधीही थकबाकीच्या मुद्यावर वीज कंपनीच्या कार्यालयाला सील ठोकले नाही. एक महिन्याचे पैसे थकले म्हणून वीज कापणे उचित नसल्याचे मनपा प्रशासनाने नमूद केले.सिद्धार्थ उद्यान अंधारातसिद्धार्थ उद्यानात दोन दिवसांपासून सर्वत्र अंधार पसरला आहे. पर्यटक ७ वाजेपर्यंत उद्यानात थांबतात. मागील दोन दिवसांपासून पर्यटकांना ६ वाजताच उद्यानातून बाहेर काढावे लागत आहे. प्राणिसंग्रहालयातही अशीच अवस्था असून, वीज कंपनीने कनेक्शन कापल्यामुळे प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्या ऐरणीवर आला आहे. रात्री प्राण्यांची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बॅटरी, इमर्जन्सी लाईटचा आधार घ्यावा लागत आहे.
महापालिका-महावितरणमध्ये जुंपली
By admin | Published: September 24, 2016 12:14 AM