लातूर : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला, तरी तसे शाळा-महाविद्यालयांना विद्यापीठ व बोर्डाकडून आदेश नसल्यामुळे परीक्षा शुल्क वसुली सुरूच आहे. सध्या दहावीची परीक्षा फीस भरण्याची मुदत असल्याने विद्यार्थी शुल्क भरूनच परीक्षा फॉर्म भरत आहेत.लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यांची नजर आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. या नजर आणेवारीनुसार जिल्ह्यातील दहाही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार आहे. परंतु, सध्या शुल्क आकारले जात आहे. दहावीसाठी ४२० रुपये तर बारावीसाठी ४७० रुपये शुल्क आहे. दहावीसाठी परीक्षा शुल्क भरण्याची मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंत आहे. शासनाने शुल्क माफीचा निर्णय जाहीर करून आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. परंतु, एकाही शाळा-महाविद्यालयाला शुल्क घेऊ नये, असे आदेश विद्यापीठ अथवा बोर्डाने दिले नाहीत. बारावीसाठी परीक्षा शुल्क भरण्याची मुदत ३१ आॅगस्टलाच संपली आहे. या मुदतीतच विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून परीक्षा फॉर्म भरला आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडूनही विद्यापीठ नियमानुसार परीक्षा शुल्क घेतले आहेत. गतवर्षीही दुष्काळ असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शुल्क माफ होती. गतवर्षीच्या निर्णयात केवळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भरलेले परीक्षा शुल्क आता वाटप केले जात आहेत. गतवर्षीचे ३५५ रुपये बारावीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सर्वच महाविद्यालयांत सुरू आहे. यंदा दहावीसाठी ४२० आणि बारावीसाठी ४७० रुपये असे सर्वसाधारणपणे परीक्षा शुल्क आहे. ते सर्वच शाळा-महाविद्यालयांकडून आकारण्यात आले आहे. मग शुल्क माफीचा निर्णय कधी अंमलात येणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)टंचाईग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या गतवर्षीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाले असून, त्याचे वाटप सर्वच शाळा-महाविद्यालयांत सुरू आहे. दयानंद कला महाविद्यालयातील बारावीच्या १८५ विद्यार्थ्यांना ३५५ रुपये प्रमाणे शुल्क परत केले जात आहे. या महाविद्यालयातून १८५ विद्यार्थ्यांना ६५ हजार ६७५ रुपयांचे वाटप केले असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली.पदवीधर विद्यार्थ्यांच्या शुल्काचे काय..?४गतवर्षी केवळ दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले होते. वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले नव्हते. यंदाच्या माफीत वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे. बी.ए. प्रथम व द्वितीय वर्षासाठी ३०० रुपये आणि तृतीय वर्षासाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क आहे. केवळ परीक्षा शुल्क माफीचा हा निर्णय आहे. आणि ई,बी,सीची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच तो आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असल्यामुळे त्यांना हा शुल्क माफीचा निर्णय नाही, असे शहरातील प्राचार्य, मुख्याध्यापकांनी सांगितले.
आदेश नसल्याने विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल
By admin | Published: October 28, 2015 10:28 PM