उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:26 PM2019-03-23T16:26:53+5:302019-03-23T16:27:37+5:30
औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारले आहे
औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारले आहे. सत्तार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन औरंगाबादमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून मी तयारी करत होतो. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी गावोगावी फिरलो तर एल्गार यात्रा काढली, कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले इतके करुनही पक्षाने मला डावलले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मी लढवणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
त्याचसोबत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मी याआधीच विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मी औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडणुकीला उभा राहणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
रावसाहेब दानवेंच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसमधून लढावं यासाठी अब्दुल सत्तार प्रयत्नशील होते. तसेच औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसमधून आणून तिकीट द्यावी यासाठी सत्तार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे आग्रह धरला होता. मात्र अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने वैफल्यग्रस्त भावनेतून अब्दुल सत्तार निवडणूक लढण्याची भाषा करत आहेत अशीही चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरु आहे.