औरंगाबाद : अवघा तीन ते साडेतीन वर्षांचा चिमुकला कोठून तरी चालत थेट गुलमंडीवर आला.... कावराबावरा फिरत असलेला हा बालक पोलिसांच्या नजरेस पडला आणि त्यांनी त्याची विचारपूस केली असता, त्यास त्याचे नावही सांगता येत नव्हते. असे असताना पोलिसांनी दोन तास प्रयत्न करून आणि व्हॉटस्अॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून त्याच्या वडिलाचा शोध घेतला आणि त्यास त्यांच्या ताब्यात दिले. रियान सलीम शेख (रा. सब्जीमंडी, पैठणगेट) असे या बालकाचे नाव. मंगळवारी दुपारी तो एकटाच घराबाहेर पडला आणि खेळत, खेळत चालत थेट गुलमंडीवर पोहोचला. सध्या गणेशोत्सव असल्याने गुलमंडीवर मोठी गर्दी असते. या गर्दीतून एकटाच कावराबावरा फिरत असलेला हा चिमुकला सिटीचौक ठाण्यातील नाईक कॉन्स्टेबल फिरोज पठाण, पोलीस क र्मचारी परवेज खान, महिला पोलीस घनसावत यांंना दिसला.त्यांनी त्यास जवळ बोलावून त्याचे नाव विचारले. मात्र घाबरलेल्या बालकास त्याचे नावही सांगता येत नव्हते. त्यामुळे त्यास दुचाकीवर बसवून पोलिसांनी सिटीचौक ठाण्यात नेले. तत्पूर्वी पैठणगेटकडून एका ज्यूस सेंटरसमोरून जात असताना तो एक जणाला पाहून पप्पा म्हणाला. त्यामुळे पठाण हे त्या व्यक्तीकडे गेले. तेव्हा हा आपला मुलगा नाही, असे त्या व्यक्तीने सांगितले. तेथील दुसऱ्या ज्यूस सेंटरसमोरून जात असताना तो पुन्हा पप्पा म्हणाला. यावरून पोलिसांना अंदाज आला की, याचे कोणी तरी ज्यूस सेंटरशी संबंधित आहे. यावेळी ज्यूस सेंटरचालकांसह विविध लोकांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर या चिमुकल्याचा फोटो पाठवून त्याच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.त्यानंतर काही वेळाने रियानचे वडील ज्यूस सेंटरवर आले. आपला मुलगा हरवला आहे, असे त्यांनी ज्यूस सेंटरचालकांना सांगितले. त्यानंतर सिटीचौक ठाण्यात ते गेले असता तेथे रियान हा एका महिला पोलिसासोबत खेळत असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांच्या प्रयत्नामुळे चिमुकला दोन तासांमध्ये वडिलांपर्यंत पोहोचला.
पोलिसांमुळे चिमुकला २ तासांत पुन्हा वडिलांकडे पोहोचला
By admin | Published: September 10, 2016 12:28 AM