लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पाच दिवसांच्या उघडिपीनंतर गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारी वरुणराजाने पुनरागमन केले. यामुळे कोवळ्या पिकांना संजीवनी, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पुन्हा एकदा शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, कपाशीची १ लाख ६८ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. एकूण २ लाख ८१ हजार हेक्टरवर पेरण्यांची नोंद कृषी विभागात झाली.गतवर्षी वरुणराजाने सुरुवातीपासूनच समाधानकारक हजेरी लावली होती. त्यामुळे नद्या, नाल्यांसह ओढे, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षीही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. त्याप्रमाणे जिल्ह्यातील गेवराई, वडवणी, बीड तालुका, पाटोदा, आष्टी या तालुक्यात पावसाने रिमझिम हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. तसेच कपाशीची ही लागवड केली. आष्टी - पाटोदासह वडवणी तालुक्यातील काही भागात १० दिवसांपूर्वी लावलेल्या कपाशीने डोके वर काढले आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी झालेल्या पावसाने या पिकांना काही प्रमाणात का होईना आधार मिळणार आहे.
पावसाने पिकांना संजीवनी
By admin | Published: June 24, 2017 12:20 AM