वाळूज महानगर : सिडकोतील सोसायटीचे ड्रेनेज व सांडपाण्याचे नागरी वसाहतीलगत तळे साचल्याने छत्रपतीनगर वासियांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. घरालगतच सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिडकोच्या ड्रेनेजलाईनचे काम रखडल्याने द्वारकानगरी, दिशाबन कुंज आदी सोसायटीचे ड्रेनेज व सांडपाणी फुलेनगरालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर उघड्यावर सोडले आहे. हे पाणी छत्रपतीनगरालगत नागरिकांच्या घराशेजारी साचत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप आले असून पाणी छत्रपतनीगर-वडगाव रस्त्यावरुन वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
उग्र वास व डासांमुळे आजार पसरून साथरोगाची लागण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रकाश निकम, अशोक वाहुळ, सुरेश सोनवणे, सूजर साळे, निलेश टोपे, प्रशांत देशमुख, काकाजी जिवरग, निलेश चव्हाण आदींनी केली आहे. या संदर्भात सिडकोचे अभियंता दीपक हिवाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.