औरंगाबाद : रविवारचा आठवडी बाजार ते मोतीकारंजा रस्त्यावरील कूलरच्या दुकानाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने शेजारची अन्य दुकाने आगीपासून वाचली. घटनेत सुमारे आठ ते नऊ लाखांचे कूलर्स आणि अन्य सामानांचे नुकसान झाले.
मोतीकारंजा रस्त्यावर सय्यद अब्बास यांच्या मालकीचे रॉयल कूलर्स दुकान आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दुकानात वेगवेगळ्या रेंजचे सुमारे सहाशे ते सातशे कूलर्स विक्रीसाठी ठेवले होते. सय्यद अब्बास आणि त्यांचा मुलगा सय्यद शहाबाज यांनी बुधवारी दुकान उघडले. सकाळी सय्यद पिता-पुत्र आणि सेल्समन शेख इद्रीस हे सफाई करीत होते, तेव्हा अचानक दुकानातील विद्युत मीटरमधून शॉर्टसर्किट झाले. स्पार्किंग होऊन कूलर्सवर ठिणगी पडल्याने दुकानाला आग लागली. यावेळी दुकानदार आणि शेजाऱ्यांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र दुकानातील कूलर्सच्या जाळ्या, इलेक्ट्रिकल वायरिंगमुळे आग भडकली.
या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत संपूर्ण दुकानात आग पसरली होती. जवानांनी सुमारे अर्धा ते पाऊणतास केलेल्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानदार सय्यद अब्बास यांनी दिली.