पैठण- शहागड महामार्गावरील टाकळी अंबड येथे बसस्थानकाशेजारी निवृत्त सैनिक राम भाऊराव वाकडे यांची गट नंबर १५ मध्ये शेती आहे. त्यांनी लागवड केलेला ऊस तोडणीवर आला होता. याच शेतातून महावितरणची ११ केव्हीची (मेन लाइन) गेलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मेन लाइनचे विद्युत पोल वाकलेले आहेत. वाकडे यांनी अनेक वेळा महावितरण कार्यालयालयाकडे सदर पोल दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांची कोणीही दखल घेतली नाही. सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक या लाइनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन विजेच्या ठिणग्या उडाल्या. यात तोडणीवर आलेल्या उसाच्या पाचटाने लगेच पेट घेतला. ही बाब माहिती पडताच बसस्थानकावरील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन उसाला लागलेली आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत राम वाकडे यांचा दोन एकर, गंभिराबाई वाकडे यांचा एक एकर, पुष्पाबाई वाकडे यांचा एक एकर, तर मुसा शेख यांचा अर्धा एकर ऊस जळून खाक झाला होता. यात सदर शेतकऱ्यांचे सुमारे चार लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
फोटो : टाकळी अंबड येथील शेतकऱ्याच्या उसाला लागलेली आग.