लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य दलितोद्धारासाठी वाहून घेतले. या दलितोद्धाराच्या चळवळीत दलितेतरांनी मोलाचे सहकार्य केले. यात बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून सर्व जाती, धर्मांतील लोकांनी साथ दिली. ही साथ चळवळीला हत्तीचे बळ देणारी असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक योगिराज बागूल यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या विषयावर योगिराज बागूल यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते, तर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे मंचावर उपस्थित होते.यावेळी योगिराज बागूल म्हणाले, बाबासाहेबांना दलितेतर सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांचे आणि बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आर.डी. गवळी यांनी बाबासाहेबांना साथ दिली म्हणून समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. त्यांच्या मुलाचे लग्न शेवटपर्यंत झाले नाही. दगडूसेठ भिलारे यांच्याही तीन मुली अविवाहितच राहिल्या. फतेलाल खान मुठेली याने बाबासाहेबांसाठी महाडच्या चवदार तळ्याच्या लढ्यात मोलाची साथ दिली. या लढ्यात सुर्भानाना टिपणीस आणि अनंतराव चित्रे यांनी कट्टरतावाद्यापासून बाबासाहेबांचे संरक्षण व्हावे, यासाठी पुढे आणि पाठीमागे माणसे उभे करीत बाबासाहेबांना मध्यभागी ठेवले होते.पुणे कराराच्या वेळी बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी जागरण करून बाबासाहेबांना संरक्षण पुरविले. सी.के. बोले, देवराव नाईक, भारत कद्रेकर, व्ही.जी. राव, बॅरिस्टर समर्थ, कमलाकांत चित्रे आदींचे बाबासाहेबांसोबत घनिष्ठ संबंध होते. कमलाकांत चित्रे आणि बाबासाहेब यांच्यातील १३६ पत्रांचा पत्रव्यवहार आहे. त्यावरून संंबंध लक्षात येतात. पुण्यातील मानाच्या गायकवाड वाड्यातील श्रीधरपंत टिळक यांची साथही मोलाची ठरली.अॅड. एस.जी. जोशी यांनी तर बाबासाहेबांना पडत्या आणि आर्थिक हलाखीच्या काळात सहकार्य केले. मुंबईतील चर्नी रोड येथे स्वत:च्या घरात क्लासेस घेण्याची परवानगी दिली. पुढे बाबासाहेब कामगारमंत्री झाल्यानंतर जोशी यांना थेट चीफ लेबर कमिश्नर म्हणून नेमले होते. तेव्हा कामगार कायदे बाबासाहेब आणि जोशी यांनीच बनवलेले आहेत. ते अद्यापही कायम आहेत. याशिवाय इतरही दलितेतरांनी बाबासाहेबांना मोलाचे सहकार्य केले असल्याचे योगिराज बागूल यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी केला.यावेळी डॉ. चोपडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेत असतानाच अध्यापनाचे कार्य केले आहे. प्राध्यापक, प्राचार्य म्हणून बाबासाहेबांची कारकीर्द महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी केले....अन् स्वत:चा कोट सुर्बानानांना दिलाबाबासाहेब यांना महाड येथील सुर्बानाना टिपणीस यांनी मोलाची साथ दिली. बाबासाहेब त्यांच्या महाड येथील गोविंद निवास या घरी १५-१५ दिवस राहत होते. यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. यातून सुर्बानाना यांची आर्थिक परिस्थिती तोलामोलाची बनली होती. तेव्हा बाबासाहेब मंत्री होते. त्यांची तार आली, मी महाडला येतोय म्हणून. तेव्हा त्यांच्या घरात दिव्याला टाकण्यासाठी साधे तेलही नव्हते.बाबासाहेब आले तेव्हा त्यांना ही सुर्बानानांची परिस्थिती दिसून आली. चार दिवसांनंतर जाताना बाबासाहेबांनी स्वत:चा कोट लहान होत असल्यामुळे सुर्बानानांना दिला अन् सांगितले, उद्या मुंबई आकाशवाणीत मुलाखतीला जा. मी अधिकाºयाला बोललो आहे. तुला नोकरी मिळेल. हा कोट मुलाखतीला जाण्यासाठी दिला होता. कारण मुलाखत सुटाबुटातच दिली पाहिजे. इतकी बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि दलितेत्तर सहकाºयाविषयी आत्मीयता होती, असेही योगिराज बागूल यांनी सांगितले.
दलितेतरांच्या सहकार्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:12 AM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य दलितोद्धारासाठी वाहून घेतले. या दलितोद्धाराच्या चळवळीत दलितेतरांनी मोलाचे सहकार्य केले. यात बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून सर्व जाती, धर्मांतील लोकांनी साथ दिली. ही साथ चळवळीला हत्तीचे बळ देणारी असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक योगिराज बागूल यांनी केले.
ठळक मुद्देयोगिराज बागूल : विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान