छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय आयुष विभागाने राज्यातील शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित आयुर्वेद पदव्युत्तर महाविद्यालयात २०२३-२४ वर्षासाठी मंजूर केलेल्या १२११ जागांमधील तब्बल ९७ जागा प्राध्यापक नसल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने कमी केल्या आहेत. त्यात शासकीय व अनुदानित महाविद्यालयांतील जागांचाच समावेश असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राज्यात जीवघेणी स्पर्धा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास शासकीय महाविद्यालय, अनुदानित महाविद्यालयात प्रवेश हवा असतो. त्या ठिकाणी शैक्षणिक शुल्कही कमी असते. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षा देतात. त्यातील गुणांच्या आधारे प्रवेश मिळतो. आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी सेलतर्फे प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान नोंदणी केल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी पहिला फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एकूण २१ आयुर्वेद पदव्युत्तर महाविद्यालयातील विषयनिहाय जागांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय आयुष विभागाने या महाविद्यालयांमध्ये १२११ जागांची मंजुरी दिली होती. त्यातील अनेक शासकीय व अनुदानित महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे विद्यापीठाने तब्बल ९७ जागा कमी केल्या आहेत. प्राध्यापकांची नियुक्ती केल्यानंतर कमी केलेल्या जागा पूर्ववत केल्या जातील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. या कमी झालेल्या जागांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
एमपीएससीकडून भरतीसाठी जाहिरातमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आयुर्वेदच्या ४० विषयातील तब्बल २२८ जागांची भरती करण्यासाठी ऑनलाइन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जागांच्या भरतीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रिया पूर्ण हाेईपर्यंत जागांची भरती होणार नसल्यामुळे कमी झालेल्या ९७ जागा मिळणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.
लवकरच जागा पूर्ववत होतीलशासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापकांची कमतरता असल्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने काही विषयांच्या जागा कमी केल्या आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी एमपीएससी आयोगाने प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात दिली आहे. लवकरच या जागा भरल्यानंतर जागा पूर्ववत होतील.- डॉ. रमणरेड्डी घुंगराळकर, संचालक, आयुष संचालनालय, मुंबई