छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. धरणे आणि विहिरी आटल्याने मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील उन्हाळी पिकांची सरासरी पेरणी निम्म्यावर आली आहे.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे ३२ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ्यात ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकांची पेरणी केली जाते. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून त्यांच्या आधिपत्याखालील धरणांमधून उन्हाळी पिकांसाठी पाटाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पुरविले जाते. मात्र, गतवर्षी मुसळधार पाऊस न झाल्याने नदी, नाले भरले नव्हते. परिणामी लहान, मोठ्या धरणांमध्ये पाणी न साचल्याने शिल्लक पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यामुळे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनीही उन्हाळी पिकांसाठी पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १४ हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी होते. यावर्षी केवळ ८ हजार ९०० हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. जालना जिल्ह्यात सरासरी १० हजार हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात या जिल्ह्यात केवळ १,५४२ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली. बीड जिल्ह्यात सरासरी ७ हजार ४५५ हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र आहे. बीड जिल्ह्यात १०२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
‘असे’ शेतकरीच उन्हाळी पिके घेतातज्या शेतकऱ्यांकडे शेततलाव पाण्याने भरलेले आहेत, ज्यांच्या विहिरींना बाराही महिने उत्तम असा जलस्रोत आहे, असे शेतकरीच उन्हाळी पिके घेतात, असे कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले. गतवर्षी पाऊस कमी झाला होता, यामुळे उन्हाळी पिकाचे क्षेत्रही घटले आहे.