फुलंब्री : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फुलंब्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षेचे दडपण कमी झाले असून स्फूर्ती मिळाल्याचे सांगितले.
परीक्षा पे चर्चा या उपक्रमात आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला. राजकीय, अभ्यासाचा तणाव, परीक्षेतील कॉपी अशा विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी दिली. वेळेअभावी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता आले नाहीत. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मोठी स्क्रीन लावून हा कार्यक्रम प्रदर्शित करण्यात आला. येथे शहरातील पाच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन, मुख्याध्यापक जगदीश सोनवणे, पर्यवेक्षक गोविंद पायघन, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ, अनुराधा चव्हाण, सर्जेराव मेटे, भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपा महिला तालुकाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर, राम बनसोड, बाळासाहेब तांदळे, वाल्मिक जाधव, सुचित बोरसे, सुमित प्रधान यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.
कॉपी करणाऱ्यांना भविष्य नसते एका विद्यार्थ्याने परीक्षेत अनेकजण कॉपी करून पास होतात अशी चिंता व्यक्त केली. यावर मोदी यांनी कॉपी करणाऱ्यांना भविष्य नसते असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत दुजोरा दिला. तसेच एका प्रश्नांचे उत्तर देताना मोदी यांनी मी विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही. पण टीकेचा विचार करतो, त्यातून बदल घडवतो असे म्हटले.
स्फूर्ती मिळाली पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी परीक्षेला सामोरे जाताना तणाव हाताळण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे मला स्फूर्ती मिळाली आहे. त्यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या काळातील परीक्षेला सामोरे जाणार.- जयराज भागीनाथ शेवाळे, विद्यार्थी
दडपण कमी झालेबोर्डाची परीक्षाजवळ आली आता न घाबरता तिला सामोरे जायचे. जी गोष्ट मनापासून कराल ती सोपी होते. आपल्या मनाला जे आवडत ते करायला हवे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन भावले. माझ्या मनावरील दडपण कमी झालेले - अनुजा प्रवीण साळवे, विद्यार्थिनी