औरंगाबाद : शहरात गुरुवारी सायंकाळी पावसामुळे विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी आवश्यक दृश्यमानताच नव्हती. त्यामुळे शहरावर ६ घिरट्या मारून इंडिगोचे विमानमुंबईला परत गेले. त्यानंतर दोन तासांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास हे विमान पुन्हा औरंगाबादला आले आणि रात्री ९.१० वाजता मुंबईसाठी उड्डाण घेतले.
इंडिगोचे मुंबई-औरंगाबाद हे विमान नियमित वेळेनुसार सायंकाळी ५.४० वाजता शहराच्या आकाशात दाखल झाले. परंतु त्याच वेळी शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. विमान उतरण्यासाठी किमान १२०० मिटरची दृश्यमानता आवश्यक होती. परंतु ही दृश्यमानता ३०० मीटरवर आली होती. त्यामुळे विमान उतरणे अशक्य होते. अशा परिस्थितीत विमानाने शहरावर ६ घिरट्या मारल्या. तरीही लँडिंगसाठी दृश्यमानता मिळाली नाही. त्यामुळे हे विमान पुन्हा मुंबईला गेले. त्यानंतर हे विमान रात्री ८ वाजेच्या सुमारास हे विमान मुंबईहून औरंगाबादला दाखल झाले. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हा प्रकार झाल्याचे विमानतळाचे सहायक सरव्यवस्थापक विनायक कटके यांनी सांगितले.