प्रवीण जंजाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर): लग्न किंवा इतर शुभकार्याच्या वेळी मुख्य प्रवेशद्वारावर तुतारी वाजवून स्वागत करण्याची परंपरा आता लोकसभा निवडणूक संपेपर्यंत खंडित होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्याने या वाद्यावर संक्रांत आली आहे. वादकांना चार पैसे या दिवसांमध्येच मिळतात; परंतु आचारसंहितेमुळे त्यांच्या हातातून सिझन गेला आहे.
कशी मिळाली तुतारी?
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऑगस्ट २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देत पक्षाचे घड्याळ हे चिन्हही त्यांनाच बहाल केले.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा वेगळा गट म्हणून मान्यता देत तुतारी हे चिन्ह दिले.
- सध्या लग्नाचे दिवस आहेत. लग्नकार्य किंवा इतर शुभ समारंभात मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी वादक तुतारी वाजवतात; मात्र शरद पवार गटाने तुतारी निशाणी घेतल्याने आचारसंहितेत ही तुतारी अडकली आहे. तुतारी वाजवणाऱ्यांचा हा सिझन आहे.
तुतारी ही एका पक्षाची निशाणी असल्याने सार्वजनिक ठिकाणी त्यास वापरण्यावर बंदी घालण्यात येईल.- संतोष गोराड, उपविभागीय अधिकारी, कन्नड