आडूळ (जि. औरंगाबाद) : आडूळ (ता. पैठण) प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या २७ वर्षीय महिलेला रात्री वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचे बाळ (पुरुष) पोटातच दगावले. या महिलेला घाटी रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच ही दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली. यास जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
पैठण तालुक्यातील वडवाळी येथील ललिता नंदू गायकवाड या माहेरी आडूळ बु. येथे बाळंतपणासाठी आल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी प्रसववेदना सुरू झाल्याने कुटुंबियांनी सायंकाळी आरोग्य केंद्रात दाखल केले होते; परंतु तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी व इतर कर्मचारी हजर नसल्याने तासभर उपचारच मिळाले नाहीत. यानंतर रात्रपाळीच्या सेविका केंद्रात आल्यावर त्यांनी तपासणी न करताच रेफर पत्र देत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवले. प्रवासात बाळ दगावले. दरम्यान, बाळंतिणीची प्रकृती गंभीर झाल्याने औरंगाबादला पाठविले, असे वैद्यकीय अधिकारी, डॉ. नीळकंठ चव्हाण यांनी सांगितले.