दिंद्रूड: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व संबंधित गावांच्या उदासिनतेमुळे दिंद्रूडपासून जवळ असलेल्या चाटगाव तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तलावाच्या भिंतीवरच मोठमोठी झाडे उगवली आहेत, त्यामुळे तलावास धोका पोहोचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तविली जात आहे.दिंद्रूड, चाटगाव, संगम, देवदहिफळ या चार गावांच्या सीमेवर असलेल्या चाटगाव साठवण तलावाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे उगवली आहेत. मागील तीन वर्षांपासून ही परिस्थिती बदलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. गावातील पंचायत मंडळीचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या भिंतीवर बाभळ, सुबाभुळ, चिलारी, सिरस आदी प्रकारच्या जातीची झाडे उगवलेली आहेत. ही झाडे मोठमोठी झाली असल्यामुळे त्यांची मुळी तलावाच्या भिंतीत खोलवर जात आहेत, त्यामुळे या भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. एवढी गंभीर परिस्थिती उद्भवून सुद्धा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या तलावाच्या भिंतीवरील झाडे तोडून होणारा अनर्थ टाळावा, अशी मागणी प्रकाश ठोंबरे, हनुमान बडे, बालासाहेब बडे यांनी केली आहे. या तलावावरच नाही तर तेलगाव पाटबंधारे विभागाचे पूर्ण शाखेसाठी दोन कर्मचारी आहेत. दहा ते बारा तलावाचे काम अल्पशा कामगारावर आपण करू शकत नसल्याचे कनिष्ठ अभियंता डी.बी. गुळभिले यांनी सांगितले. (वार्ताहर)
भिंतीवरील झुडपांमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात!
By admin | Published: August 11, 2014 12:07 AM