शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील जवळपास १०० गावांना शेंद्रा एमआयडीसीसाठीतील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ही जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे भर उन्हात पाण्यासाठी गावातील महिलांची भटकंती सुरु आहे.
परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, या टंचाईकाळात जायकवाडीतून एमआयडीसीला दिल्या जाणाऱ्या पाण्यातून तालुक्यातील पूर्व भागाला एमआयडीसीतील जलकुंभातून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तालुक्यातील १०० पेक्षा जास्त गावांना एमआयडीसीतील जलकुंभातून १२० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. २०० पेक्षा जास्त फेºया मारणारे टँकर अचानक बंद झाले आहेत. त्यामुळे गावांना भीषण पाणीटंचाईचे संकट सामोरे जावे लागत आहे.
दुसरीकडे खाजगी टँकरचेही भाव वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. परिसरातील विहिरी, तलाव कोरडेठाक पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्त करुन गावांना पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.