औरंगाबाद : जिल्ह्यातील दीड लाख विहिरींपैकी बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असून, २२५ शाळांतील बोअरवेल आटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. असे असताना ५ हजारांहून अधिक विहिरी नव्याने खोदण्याची कामे सुरू असून, २२५ शाळांतील बोअरवेल पूर्णत: आटल्यामुळे त्या शाळांत पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.बोअरवेल आटल्यामुळे शाळांतील प्रसाधनगृहांचा पाण्याअभावी वापर होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळात मोठी कुचंबणा झाली. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यात याव्यात, त्यामध्ये पाणीपुरवठ्याची सुविधा असावी. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी वारंवार बैठक घेऊन पुनर्भरणाबाबत आदेशित केले असले तरी शाळा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.शाळांतील प्रसाधनगृह पाण्याअभावी बंद ठेवावे लागत आहेत. जानेवारीपर्यंत बोअरवेल्सना थोडेफार पाणी असते. त्यानंतर पुढील चार महिने त्या शाळांमध्ये पाणी नसल्यामुळे ती प्रसाधनगृहे वापरात येत नाहीत. दुसरीकडे दीड लाखांपैकी १० टक्के विहिरींचेही पुनर्भरण होत नसल्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण होत आहे. जमिनीखालच्या पाण्याचा वापर वाढल्याने भूजल पातळी कमी होत आहे. विहिरी पावसाळ्यानंतर लवकर कोरड्या पडतात. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविली पाहिजे. यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या दृष्टीने विहिरीचे व बोअरवेलचे पुनर्भरण करण्याची सध्या गरज आहे.अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी सांगितले, जिल्ह्यातील २२५ शाळांमधील बोअरवेल आटल्यामुळे तेथील प्रसाधनगृहांसाठी लागणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित शाळांची वारंवार बैठक घेऊन त्यांना बोअरवेल पुनर्भरणाच्या सूचना दिलेल्या आहेत. तशीच बाब विहिरींच्या बाबतीत आहे. १० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान विहीर पुनर्भरणासाठी आहे. पुनर्भरणासाठी मे महिन्यातच कार्यवाही केली तर मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढून अनेक शेतकºयांना त्याचा फायदा होईल. दीड लाख विहिरींपैकी १० टक्के विहिरींचेही पुनर्भरण होत नसल्यामुळे बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तेथे हा प्रयोग होणे महत्त्वाचे आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात विहिरींना पडली कोरड, २२५ शाळांतील बोअरवेल आटले; पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 5:31 AM