शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातून जात असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर चालू असून, या महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात ट्रकने मुरुम आणण्यात येत आहे. महामार्गाच्या कामामुळे धूळ उडत असल्याने परिसरातील फळबागा धोक्यात आल्या आहेत.
औरंगाबाद तालुक्यातील बेंदेवाडी येथील डाळींब उत्पादक शेतकरी गितेश बाबूलाल शिहिरे व सतीश बाबूलाल शिहिरे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गितेश शिहिरे व सतीश शिहिरे यांची बेंदेवाडी शिवारातील गट नंबर ७५ मध्ये १८०० डाळिंब पिकांची लागवड केलेली आहे.सदरील फळबाग आजरोजी फुलधारणेत आहे. समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू असून, यासाठी मुरुमाची वाहतूक ट्रकने करण्यात येत आहे. यामुळे मोठमोठ्या मशिनरी या रस्त्यावरुन जात असल्याने प्रचंड धूळ उडत आहे.
या धुळीमुळे डाळिंब बागा धोक्यात आल्या असून, धुळीने डाळिंब फळाला डाग पडत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली आहे. परंतु अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
गितेश शिहिरे म्हणाले की, यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे फळबाग नियोजनासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून आम्ही यावर्षी पाच लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. परंतु धुळीमुळे डाळिंब पिक धोक्यात आल्यामुळे कर्ज कसे भरावे असा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे.