औरंगाबाद : अज्ञात कारणावरून झालेल्या वादानंतर पतीने पत्नीचा डंबेल्सचा रॉड मारून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये घडली. चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कविता सिद्धेश त्रिवेदी (३२), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पिसादेवी येथील रुक्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये सिद्धेश त्रिवेदी हा पत्नी कविता आणि नऊवर्षीय रुद्र, चार वर्षांच्या रुषी या मुलीसह राहतो. सिद्धेश कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत आहे. सोमवारी रात्री पती-पत्नीत काहीतरी कारणावरून वाद झाला. यानंतर रात्री सिद्धेशने स्वयंपाक खोलीत कविताच्या डोक्यावर डंबेल्स रॉड आणि दगडाने मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. मृतदेहासोबत दोन्ही मुलांना कोंडून फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून तो पसार झाला.
मंगळवारी दिवसभर दोन्ही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. मात्र, ही बाब शेजाऱ्यांना समजली नाही. रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास मुलांनी मुख्य दरवाजाजवळ जाऊन मोठ्याने रडण्यास सुरुवात केली. रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्रिवेदीच्या फ्लॅटकडे धाव घेतली. मात्र, दाराला बाहेरून कुलूप लावलेले दिसले आणि आतून मुलांचा रडण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडले. शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिल्यानंतर कविता रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली.
या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी चिकलठाणा पोलिसांना कळविली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि हवालदार रवींद्र साळवे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक लॅबचे पथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी त्रिवेदी कुटुंबाच्या नातेवाइकांना घटनास्थळी बोलावले होते.
मुलाला हाकललेआरोपी सिद्धेश आणि कविता यांच्यात भांडण सुरू असताना त्यांचा मोठा मुलगा हा तेथे आला तेव्हा सिद्धेशने त्यालाही ढकलत हाकलून दिले, असे त्याने पोलिसांना सांगितले.