छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात वर्ग-४ च्या सेवेत कायम कर्मचाऱ्यांच्या नावावर इतरच कामगार, मजूर काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही माहिती रुग्णालय प्रशासनापर्यंतही पोहोचली आहे. त्याला कायमस्वरूपी आळा बसण्यासाठी आता घाटी रुग्णालय प्रशासन कामाला लागले आहे.
घाटी रुग्णालयात स्वच्छतेच्या कामापासून तर रुग्णांची स्ट्रेचरवरून ने-आण करण्याची जबाबदारी वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांकडे आहे. अनेक कर्मचारी हे काम अगदी प्रामाणिकपणे करीत आहेत; परंतु, काही कर्मचाऱ्यांकडून स्वत:च्या जागेवर इतरांनाच कामावर पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रकार अंगलट येणार असे लक्षात येताच घाटीतील वाॅर्डात काम करणाऱ्या या ‘डमी’ कामगारांची माहिती प्रत्येक वाॅर्डातून प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दर तीन तासांनी वाॅर्डांत राउंडघाटी रुग्णालयातील प्रत्येक वाॅर्डात आता दर तीन तासांनी स्वच्छता निरीक्षक आणि निवासी वैद्यकीय अधिकारी राउंड घेऊन वर्ग-४ चे कर्मचारी कामावर आहे की नाही, याची पडताळणी करणार आहेत. कोणी गैरहजर राहिल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
पर्मनंट कर्मचाऱ्यांना, ‘डमीं’ना किती पगार?वर्ग-४ च्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना ३० ते ४० हजारांच्या घरात वेतन आहे, तर डमी कर्मचाऱ्यांना ८ हजार ते १० हजार रुपये पगार दिला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
किती डमी कामगार? आजघडीला प्रशासनापर्यंत अशा १५ कर्मचाऱ्यांची माहिती पोहोचली आहे; परंतु, ही संख्या यापेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.घाटीतील वर्ग-४ चे कायमस्वरूपी कर्मचारी: एकूण - ७४४ - कार्यरत- ४३२ - रिक्त जागा- ३१२
कायद्याने गुन्हाडमी कर्मचाऱ्यांनी काम करणे, हे कायद्याने गुन्हा आहे. अशा कर्मचाऱ्यांकडून काही चूक झाली तर कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न आहे. या प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाची डोळेझाक होत आहे.- इंदुमती थोरात, सचिव, गर्व्हन्मेंट नर्सेस फेडरेशन
बायोमेट्रिक हजेरी सुरू करूलवकरच आधारबेस बायाेमेट्रिक सध्या वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी आहे. लवकरच वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांसाठी आधारबेस बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात येईल.- डाॅ. संजय राठोड, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय