औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेत डमी परीक्षार्थी सापडल्याचे तुम्ही ऐकवीत असाल, मात्र आता कोरोनाचे डमी रुग्ण कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल केले जात असल्याची खळबळजन माहिती उघडकीस आली आहे. महापालिकेच्या चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात पॉझीटीव्ह म्हणून दाखल झालेले दोन रुग्ण बोगस असल्याचे (Corona dummy patient found in Aurangabad) आज तपासात उघडकीस आले. या प्रकरणी महापालिकेने तातडीने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दोन दलाल, बोगस रुग्ण आणि पॉझिटिव्ह आलेल्या दोन अशा सहा जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
मेल्ट्रॉन रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगडकर यांनी सोमवारी रोजी रात्री उशीराने तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, सिद्धार्थ उद्यानासमोर शनिवारी सकाळी उस्मानपुरा येथील गगन पगारे व म्हाडा कॉलनी येथील गौरव काथार यांनी कोरोनाची ॲटीजन टेस्ट केली. दोघे पॉझिटिव्ह निघाले. त्यांनी आपल्या ऐवजी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथील अलोक राठोड व अतुल सदावर्ते यांना मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल केले. हे दोघेही बी.एससी.चे शिक्षण घेत आहेत. त्यांना सिडको एमआयडीसी परिसरातच राहणारे विजय मापारी, साबळे यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मेल्ट्रॉनमध्ये आणले. मेल्ट्रॉनमधील कर्मचारी शंकर सुरासे यांनी दोघांना भरती करून घेतले. मात्र, आपण कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या नावाने भरती झाल्याचे कळताच त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी डिस्चार्ज करण्यासाठी तगादा लावला. त्यांनी अधिकच तगादा लावल्याने मेल्ट्रॉनच्या डॉ. वैशाली मुदगडकर यांना शंका आली. त्यांनी अधिक विचारणा केली असता त्यांनी एजंट मापारी आणि साबळे यांनी १० दिवसांनी १० हजार रुपये देण्याचे आमिष देऊन भरती केल्याचे सांगितले.
डमी रुग्ण ताब्यात, मूळ पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध सुरु महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दोन ओरिजनल पॉझीटीव्ह रूग्णांचा शोध घेण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा यांनी सांगितले. या प्रकरणी दोन्ही डमी रुग्ण पोलिसांच्या ताब्यात असून एजंट मापारी व साबळे आणि मूळ पॉझीटीव्ह रुग्ण गगन पगारे व गौरव काथार यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती तपास अधिकारी शिवाजी चौरे यांनी दिली.