औरंगाबाद: भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या अशोकनगर येथील बंगल्यावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी शेण फेकले. थकीत वीजबिलावरून मीटर काढल्याचा आरोप करत आ. लोणीकर यांनी अभियंत्याला धमकावल्याच्या कथित ऑडियो क्लिपमध्ये मागासवर्गीयांबद्दल अपशब्दांचा वापर केला आहे, यावर आक्षेप घेत आक्रमक कार्यकर्त्यांनी शेण फेक करत जोरदार घोषणाबाजी केली.
महावितरणच्या अभियंत्याला थकीत वीज बिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत, याच जाब विचारत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शिवीगाळ केल्याची एक कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान, या क्लिपमध्ये मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत, यावर आक्षेप घेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ. लोणीकर यांच्या सातारा परिसर येथील बंगल्या समोर आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आ. लोणीकर यांच्या बंगल्यावर शेण फेकून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ निलेश आंबेवाडीकर, अनुराग शिंदे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष विजय कांबळे, गुरमित गिल,आकाश रगडे,मयुर साठे,विनोद उंटवाल आदींचा सहभाग होता.
अॅट्रॉसीटी कायद्यानुसार कारवाईची मागणीदरम्यान, मागासवर्गीय समाजाबद्दल आ. बबनराव लोणीकर यांनी कथित ऑडीओ क्लिमध्ये अपशब्द वापरले आहेत. हा सर्व प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणी आ. बबनराव लोणीकर यांच्यावर तत्काळ अॅट्रॉसीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पँथर रिपब्लिकन पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्यावतीने आज पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुणारत्न सोनवणे, अविनाश डोंगरे, अमोल भालेराव, सागर चक्रनारायण, राहुल तायडे यांच्या स्वाक्षरी आहेत.