औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावर मोबाईलवर बोलत थांबलेल्या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळालेल्या दोन संशयिताना क्रांतीचौक पोलिसांनीअटक केली. त्यांना न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शेख फैज शेख युनूस (२१, रा. बागवान गल्ली) आणि शिवा राजकिरण चावरिया (२२, रा. गांधीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, बारूदगरनाला येथील उमेश अंबादास लोखंडे (२९) हा तरुण ७ जून रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद मैदानावर मोबाईलवर बोलत उभा होता. उमेशच्या गळ्यात १ तोळा ८० मिली ग्रॅमची सोन्याची चेन होती. दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी उमेशच्या गळ्यातील सोनसाखळीस हिसका देऊन तोडून घेतली होती व पळून गेले. उमेशने क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राहुल सूर्यतळ, कर्मचारी राजेश फिरंगे, गजानन मांटे, विनोद नीतनवरे, सतीश जाधव, संतोष रेड्डी, मंगेश मनोरे, हनुमंत चाळणेवाड यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. उमेशने दिलेल्या वाहन नंबरवरून पोलिसांनी दुचाकीचा शोध घेतला. ती दुचाकी मूळ वाहनमालकाने एका जणाला विक्री केल्याचे समजले. खरेदी करणाऱ्याने पाच हजार रुपयांसाठी दुचाकी नरेंद्र राममहेर कागडाकडे तारण ठेवल्याचे सांगितले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात ही मोटारसायकल कागडाने घटनेच्या दिवशी आरोपी शिवा चावरिया यास दिल्याचे समोर आले. शिवाने आरोपी शेख फैज याच्यासह ही लुटमार केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात कागडाने आरोपी शिवाला मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी कागडालाही अटक केली.
१८ पर्यंत पोलीस कोठडीआरोपींना न्यायालयात हजर केले तेव्हा आरोपींनी लुटलेली सोनसाखळी जप्त करणे आहे. त्यांनी आणखी लुटमारीचे गुन्हे केल्याचा पोलिसांना त्यांच्यावर संशय आहे, याविषयी तपास करण्यासाठी कोठडी मागितली.