लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर: शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या नगरसेविकेच्या घरात घुसून कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.येथील जुने बसस्थानक परिसरात शिवाजी महाविद्यालयाच्या पाठीमागे काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका योगेश्वरी लक्ष्मण तोटावार यांचे निवासस्थान आहे. सकाळी दहा वाजता नगरसेविका व त्यांचे पती लक्ष्मण तोटावार हे कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात नगरसेविका तोटावार यांच्या सासू रुक्मिणबाई अरुण तोटावार या होत्या, परंतु त्याही कामात व्यस्त असतानाच चोरट्याने घरात प्रवेश केला़ खोलीतील कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये यावेळी चोरट्याने लंपास केले. कपाटाचा आवाज आल्याने घरात कुणीतरी शिरल्याचा रुक्मिणबाई यांना संशय आला़ त्यांनी आरडाओरड करण्यापूर्वीच त्यांच्यासमोरुनच चोरट्याने पोबारा केला. भरदिवसा चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़ याप्रकरणी लक्ष्मण तोटावार यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास जमादार बोंबले हे करीत आहेत.
देगलुरात नगरसेविकेचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:11 AM